८ जानेवारी २०२५ जामखेड : महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागामार्फत रब्बी पिकांच्या उत्पादनाबाबत स्पर्धा आयोजित केली जाते.गहू, हरभरा, ज्वारी या रब्बी पिकांसाठी ही स्पर्धा असणार आहे.चौंडी येथील योगेश ज्ञानोबा देवकर या उच्चशिक्षित तरुणाने त्यात भाग घेतला आहे.
मागील तीन वर्षांपासून त्यांनी एका एकरात गव्हाचे चांगले उत्पादन घेतले आहे. यावर्षी त्यांना पीक स्पर्धेविषयीची माहिती कृषि सहाय्यक वैभव साळवे यांच्याकडून मिळाली.आपल्याच शेतात आपण कष्टाने पिकवलेल्या शेतमालाची स्पर्धा आणि त्यासाठी मिळणारे बक्षीस हे जरा अनोखे वाटल्याने योगेश देवकर यांनी गहू पिकासाठी स्पर्धेत सहभागी अर्ज भरला.
एक खेळ शेतीचा म्हणून, ते या स्पर्धेकडे पाहत आहेत.या स्पर्धेत अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवणारच असल्याचा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. बक्षीस स्वरूपातील रकमेपेक्षा शेतकरी म्हणून मिळणारा मानसन्मान आणि इतर शेतकऱ्यांना मिळणारे प्रोत्साहन हे जास्त महत्वाचे वाटत असल्याचे देवकर म्हणाले.
शेतकऱ्यांसाठी अशी स्पर्धा आयोजित केल्याबद्दल महाराष्ट्र शासन व कृषि विभागाचे त्याने आभार व्यक्त केले आहेत. तसेच, चौंडीचे कृषि सहाय्यक वैभव साळवे, कृषि पर्यवेक्षक भाऊसाहेब वाघमारे, मंडळ कृषी अधिकारी के. एम. हिरडे हे वेळोवेळी शेतीविषयी चांगले मार्गदर्शन करत असल्याचे देवकर यांनी सांगितले.