एसी बसविताना विजेचा शॉक बसून तरुण ठार, शिर्डी येथील घटना

Published on -

Ahmednagar News : शिर्डीत वातानुकुलीत यंत्र एसी बसविताना विजेचा शॉक लागून २१ वर्षीय अभय पोटे या युवकाचा मृत्यू झाला. या घटनेची तक्रार वडील संजय बाबुराव पोटे यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात दिली असून पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत शिर्डी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कोपरगाव येथे तुषार होडे व संजय होडे यांच्या एसी दुरुस्ती शॉपमध्ये अभय संजय पोटे (वय २१, रा. निवारा, ता. कोपरगाव) हा कामास आहे. (दि.११) मे २०२४ रोजी अभय हा होडे बंधूंच्या दुकानात गेला होता.

तेव्हा त्यांनी शिर्डी येथे कॉम्प्लेक्समध्ये नवीन एसी बसविण्यासाठी कामास पाठवले. दरम्यान दुपारी २.३० वाजेच्या सुमारास अभय यास उच्च दाबाच्या विजेच्या धक्का बसून तो खाली पडला. यावेळी दुकान मालक होडे बंधू यांनी त्यास उपचारासाठी शिर्डी येथील साईबाबा रुग्णालयात उपचारार्थ भरती केले होते. घटनेची माहिती समजताच वडील संजय पोटे हे तातडीने आपल्या सहकाऱ्यासह रुग्णालयात दाखल झाले.

मात्र मुलगा मृत झाला असल्याची धक्कादायक माहिती त्यांना समजली. शवविच्छेदन आणि अंत्यविधीनंतर शिर्डी येथे येऊन संजय पोटे यांनी पोलिसात फिर्याद दिली. याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणासह तुषार होडे व सूरज होडे (दोघे रा. राम मंदिराजवळ, कोपरगाव) आणि आणखी एक अनोळखी संशयित अशा चौघा विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

घटनास्थळी पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी भेट दिली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पप्पु कादरी हे करीत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe