अहमदनगर Live24 टीम, 08 ऑक्टोबर 2021 :- स्थानिक निवडणुका आणि पक्षांच्या विविध संघटनांतर्फे मोर्चेबांधणी हे एक समीकरण झालं आहे. त्यातच, युवा संघटनांचा नेहमीच निवडणुकांमध्ये प्रचारासाठी मोठ्या प्रमाणात उपयोग होतो.
गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्र युवक काँग्रेसनेही संघटन बळकटीकरणाकडे विशेष लक्ष दिलं होतं. याचंच फलित यंदाच्या ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमधील युवक काँग्रेसच्या विजयात दिसून आलं आहे. धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम आणि नागपूर जिल्हा परिषदा व त्याअंतर्गतच्या पंचायत समित्यांच्या निवडणुका, तसेच पालघर जिल्हा परिषद पोटनिवडणुका झाल्या.

या मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या निवडणुकांकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. ‘सुपर ६०’ या महत्वाकांक्षी उपक्रमाच्या अंतर्गत या निवडणुकांचा प्रसार व प्रचार केला गेला. तसेच, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणावर उमेदवारी दिली गेली होती. यातील एकूण ११ जण विजयी झाले आहेत. अनेक महिन्यांपासून जिल्हा परिषदेत आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीचे वारे वाहू लागले होते.
पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांच्या रिक्त जागांवर निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून त्या निवडणुकांकडे अनेक राजकीय नेत्यांच्या नजरा खिळून राहिल्या होत्या. अनेक राजकीय पक्षांनी या निवडणुकांसाठी जोरदार कंबर कसली होती. युवक काँग्रेसनेही आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. यात ११ जणांचा विजय झाला असून यात वाशीम जिल्हा युवक काँग्रेसचे प्रवक्ता वैभव प्रतापराव सरनाईक,
कामठी तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष दिनेश ढोले, सौ. संध्याताई वीरेंद्र देशमुख हे जिल्हा परिषद, तर रिसोड विधानसभा युवक काँग्रेसचे महासचिव राहुल मनोहर बोडखे, मालेगाव तालुका युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष इमरान इमाम परसुवाले, सौ. किरण शरद वाघ, आश्विनी तुषार गर्दे, उज्वला रोशन खडसे, नागपूर जिल्हा युवक काँग्रेसचे महासचिव स्वप्निल श्रवणकर, गणेश हरिमाकर, सौ. संजिवनी रणजीत घुगे यांनी पंचायत समितीवर या युवक काँग्रेसच्या शिलेदारांनी निवडणुकांमध्ये आपले कर्तुत्व सिद्ध केले आहे.
याआधीच्या सर्व निवडणुकांमध्येही प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या नेतृत्वात तयार झालेल्या युवक काँग्रेसच्या तरुण व नव्या दमाच्या फळीचा पक्षाला फायदा झाला आहे. लोकसभा निवडणूकीत ‘सुपर ४०’ आणि विधानसभा निवडणुकांत ‘सुपर ६०’ या अभियानांतर्गत बूथ लेव्हल पर्यंतचा प्रचार यशस्वी झाला. २०१९च्या निवडणुकांमध्ये ‘सुपर ६०’ अंतर्गत ४५ मतदारसंघांमध्ये युवा फळी तयार करून मतदारसंघ बळकट करण्यात आले.
मध्यंतरी ग्रामपंचायत निवडणुकांमध्येही युवक काँग्रेसचे ६३८ पदाधिकारी व कार्यकर्ते निवडून आले होते. अशा रितीने पुन्हा एकदा प्रदेश युवक काँग्रेसचा स्थानिक राजकारणातील दबदबा दिसून आला होता. सोबतच, महाराष्ट्रातील सामान्य घरांतील अधिकाधिक युवक-युवतींना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये संधी मिळावी म्हणून युवक काँग्रेसने ‘सुपर १०००’ हा उपक्रम हाती घेतला आहे.
या महत्वाकांक्षी उपक्रमांतर्गत १००० युवक व युवतींना आगामी नगर पंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, पंचायत समिती व जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये उमेदवारी देण्यात येणार आहे. तसेच त्यांच्यासाठी विशेष प्रशिक्षण देखील सुरु करण्यात येत आहे. या प्रशिक्षणाच्या माध्यमाने उमेदवारांसह निवडणूकीच्या गुणवत्तेत देखील वाढ होणार आहे. उत्तमोत्तम युवा उमेदवार स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यरत व्हावे यासाठी हे अभियान नक्कीच यशस्वी होईल असे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी प्रतिपादन केले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम