१४ जानेवारी २०२५ आश्वी : संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील संजय बबन कहार हे काल सकाळी गावातून घरी जात असताना चायना मांजाचा गळ्याला फास लागल्यामुळे ते जखमी झाले.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, संजय बबन कहार (वय ३५, रा. आश्वी खुर्द, बाजारतळ रस्ता) हे नित्याचे काम उरकुन घरी जात असताना येथील आश्वी दाढ-आश्वी खुर्द रस्त्यावर काही मुले पतंग उडवत होते.
अचानक पंतग जमीनीवर आल्याने तो चायना मांजा गळ्याला फास लागून ते जखमी झाले.गावामध्ये त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच प्रवरा कारखान्याचे माजी संचालक अॅड. अनिल भोसले, संतोषभडकवाड, कैलास गायकवाड, उमेश मोडसे, बाबसाहेब भोसले, संजय गायकवाड यांनी कहार यांच्या घरी जाऊन तब्येतीची चौकशी केली.
कहार यांचे नशीब बलवंत होते म्हणून मोठी दुर्घटना होण्यापासून वाचले असून महसूल प्रशासन तसेच पोलीस दलाने परीसरामध्ये जर कोणी व्यापारी चायना मांजा विक्री करत असेल, तर त्यावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी प्रवरा कारखान्याचे माजी संचालक अॅड. अनिल भोसले यांनी यावेळी केली.
दरम्यान, आश्वी खुर्द येथे ही दुर्दैवी घटना घडल्यानंतर ग्रामपंचायतीने गावातील सर्व पतंग विक्रेत्यांकडे मांजा आहे का, याची चौकशी केली. गावात कुठेही मांजा विक्री आढळली नाही,असे सरपंच अलका बापुसाहेब गायकवाड यांनी सांगितले.