Ahmednagar News : श्रीरामपूर तालुक्यातील मालुंजा बुद्रुक येथील पोहण्यासाठी गेलेला एका तरुण बंधाऱ्यात बुडाला. काल शनिवारी (दि.१८) दुपारी ही घटना घडली. रात्री उशिरापर्यंत त्याला शोधण्याचे काम सुरू होते.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मालुंजा बुद्रुक येथील किरण चांगदेव तोगे (वय २२), असे पाण्यात बुडालेल्या तरुणाचे नाव आहे. तो काल शनिवारी दुपारी त्याच्या दोन मित्रांसमवेत पोहण्यासाठी जातो असे, घरी सांगुन परिसरातील मालुंजा-माहेगाव दरम्यान असलेल्या बंधाऱ्यात पोहण्यासाठी हे तरूण गेले होते.

त्यांनी पोहण्यासाठी पाण्यात उड्या मारल्या. पोहत पोहत बंधाऱ्याच्या दुसऱ्या बाजूला गेली, परंतु माघारी येत असताना किरण यास दम लागल्याने तो पाण्यात बुडाला असल्याचे तेथील तरुणांनी सांगितले.
त्याच्या सोबतच्या तरुणांनी त्यास वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. त्याच्याबरोबर असलेल्या तरुणांनी सदर घटनेची माहिती गावात सांगितली. माहिती मिळताच ग्रामस्थांसह सरपंच अच्युतराव बडाख हे घटनास्थळी दाखल झाले.
त्यांनी लाडगावचे पोलीस पाटील भांड यांना सदर घटनेबाबत माहिती दिली. त्यांनीही घटनास्थळी दाखल होऊन श्रीरामपूर पोलीस ठाण्यास माहिती कळवली. तसेच महसूल प्रशासनासही कळविले. तात्काळ तालुका पोलीस ठाण्याचे पथक तसेच नायब तहसीलदार वाकचौरे घटनास्थळी दाखल झाले होते.
जमलेल्या सर्वांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. रात्री उशिरापर्यंत किरणचा शोध घेण्याचे काम सुरू होते. किरण हा एकुलता एक आहे. त्याने एमबीए शिक्षण पूर्ण केले असून एक महिना पूर्वी तो श्रीरामपूर येथेच टाटा फायनान्स मध्ये नोकरीस लागला आहे.