नेवासा- तालुक्यातील चिलेखनवाडी येथे जुन्या वादातून एका तरुणास मारहाण करत हवेत गोळीबार करण्यात आला. ही घटना शनिवारी ५ जुलैच्या रात्री घडली. या प्रकाराची माहिती मिळताच पोलीस निरीक्षकांनी रविवारी सकाळी घटनास्थळी भेट देत याप्रकरणी तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
याप्रकरणी एका महिलेच्या फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाण्यात आकाश मच्छिंद्र सावंत, अवी सावंत, योगेश सावंत (सर्व रा. चिलेखनवाडी) तसेच ऋतीक देशमुख, महेश कर्डिले, निलेश कर्डिले, शुभम गर्जे व इतर १० ते १५ अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की, ५ जुलै २०२५ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास चिलेखनवाडी गावात बीटु दळवी याच्या दुकानाजवळ झालेल्या भांडणाचा राग मनात ठेवून एरिगेशन कॉलनी चिलेखनवाडी येथे आकाश सावंत, शुभम गर्जे (रा. वडुले, ता. नेवासा), अवि सावंत (रा. देवसडे, ता. नेवासा), योगेश सावंत (रा. चिलेखनवाडी ता.नेवासा), ऋतीक देशमुख (रा. अंतरवाली, ता नेवासा), महेश कर्डिले, निलेश कर्डिले पत्ता माहीत नाही व इतर १० ते १५ अनोळखी इसमांनी माझा मुलगा कुणाल पवार यास लाकडी काठीने व रॉडने मारहाण करून दुखापत केली.
यावेळी मी भांडण सोडण्यासाठी गेले असता मला आकाश सावंत, शुभम गर्जे व अवि सावंत यांनी लाकडी काठ्यांनी मारहाण केली. या भांडणात माझी साडी व ब्लाउज फाटला आहे. तसेच सचिन दिलीप पवार याची आकाश सावंत याने गचांडी पकडली व शुभम गर्जे याने लाकडी काठीने त्याच्या हातावर व बरगडीवर मारहाण केली आहे.
त्यावेळी आम्ही आरडाओरडा केल्याने आकाश सावंत, शुभम गर्जे व ऋतीक देशमुख यांनी हातात कट्टे घेऊन हवेत गोळीबार केला, तसेच वरील इसमांनी जाताना तुम्हाला ठार मारुन टाकू, अशी धमकी दिली. आम्ही सोबत आणलेल्या मोटारसायकलींचे नुकसान केले आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी दहा ते पंधरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.