८ जानेवारी २०२५ मुंबई : राज्यातील सर्व चारचाकी वाहनांना १ एप्रिल २०२५ पासून फास्टॅग लावणे अनिवार्य करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रि मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.सर्व वाहनांचा पथकर (टोल) त्या दिवसापासून केवळ फास्टॅगद्वारेच भरावा लागणार आहे.या निर्णयामागे वाहतूक कोंडी कमी करण्याचा तसेच इंधनाची व वेळेची बचत करण्याचा विचार आहे.
या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी सध्याच्या सार्वजनिक खासगी सहभाग धोरण २०१४ मध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. फास्टॅगच्या माध्यमातून पथकर वसुली झाल्यास पथकर वसुलीत अधिक सुसूत्रता, पारदर्शकता येईल.पथकर नाक्यांवर वाहनांचा खोळंबा कमी होईल.त्यातून वेळेची, इंधनाची बचत होईल.
फास्टॅगशिवाय अन्य कोणत्याही माध्यमातून पथकर भरायचा झाल्यास किंवा फास्टॅग सुरू नसेल किंवा टॅगशिवाय वाहनाने फास्टॅगच्या मार्गिकेत प्रवेश केल्यास दुप्पट पथकर भरावा लागेल.फास्टॅग असूनही तो कार्यरत नसला,तरीही दुप्पट शुल्कच भरावे लागेल.रोख रक्कम, स्मार्ट कार्ड, क्रेडिट, डेबिट कार्ड, क्यूआर कोड किंवा अन्य कोणत्याही मार्गाने पथकर भरायचा झाल्यास दुप्पट पथकर भरावा लागेल.
एमएसआरडीसीच्या अखत्यारित ५० टोलनाके असून सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्यात २३ टोलनाके आहेत.या नाक्यांवर या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.राज्यात सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या १३ आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या ९ रस्ते प्रकल्पांवर पथकर वसुली सुरू आहे. या ठिकाणी तसेच भविष्यात पथकर वसुली कराव्या लागणाऱ्या प्रकल्पांसाठी हा निर्णय लागू असेल.