Auto News : नवीन गाडी खरेदी करणार आहात का मग तुमच्यासाठी आजची बातमी खास असेल. अलीकडे इलेक्ट्रिक वाहनाचा वापर वाढलाय.
अनेकजण नवीन इलेक्ट्रिक गाडी घेण्याचा विचार करत आहे. तसेच काही लोक आपल्याकडील पेट्रोल व डिझेल वाहने इलेक्ट्रिक वाहनांमध्ये रूपांतरित करत आहेत.

दरम्यान तुमचाही असाच प्लॅन असेल तर आजची बातमी तुमच्या कामाची राहणार आहे. आज आपण पेट्रोल डिझेल वाहने इलेक्ट्रिक मध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी किती खर्च येतो, याचे फायदे आणि तोटे काय याचा थोडक्यात आढावा घेणार आहोत.
खरंतर दिल्लीमध्ये वायू प्रदूषण सातत्याने वाढत आहे आणि याच वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर तेथील सरकारने पेट्रोल डिझेल वाहने इलेक्ट्रिक मध्ये कन्व्हर्ट करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे.
तेथील सरकार लवकरच नवी ‘दिल्ली EV पॉलिसी 2.0’ लागू करण्याच्या तयारीत आहे. याचा उद्देश राजधानीत स्वच्छ, हरित व शाश्वत वाहतूक व्यवस्थेला गती देणे हा आहे.
या धोरणात जास्त प्रोत्साहन, स्थानिक उत्पादनाला चालना, चार्जिंग पायाभूत सुविधांचा विस्तार आणि वाढत्या EV मागणीसाठी वीज व्यवस्थेचे अपग्रेड यासारख्या उपायांचा समावेश असणार आहे. विशेष म्हणजे या पॉलिसीत पहिल्यांदाच पेट्रोल व डिझेल वाहनांना इलेक्ट्रिकमध्ये रूपांतरित करण्यासाठी (रेट्रोफिटिंग) प्रोत्साहन देण्याचा प्रस्ताव सुद्धा मांडण्यात आला आहे.
ह्या ड्राफ्टनुसार, पहिल्या 1,000 रेट्रोफिट वाहनांना प्रत्येकी 50 हजार रुपयांचे अनुदान देण्याची शिफारस करण्यात आली आहे. यामुळे पेट्रोल डिझेल वाहन इलेक्ट्रिक मध्ये कन्व्हर्ट करणे किती सोयीस्कर आहे, यासाठी खर्च किती येतो असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
तीन – साडेतीन लाख रुपयांचा खर्च
पेट्रोल किंवा डिझेल कारला इलेक्ट्रिकमध्ये बदलण्यासाठी EV कन्वर्जन किट वापरली जाते. या किटमध्ये इलेक्ट्रिक मोटर, बॅटरी पॅक, कंट्रोलर, चार्जिंग सिस्टम आणि इतर आवश्यक घटक असतात. या प्रक्रियेत इंटरनल कंबशन इंजिन काढून टाकून इलेक्ट्रिक ड्राइव्हट्रेन बसवली जाते. या रूपांतराचा खर्च साधारणपणे 2 ते 3.5 लाख रुपयांपर्यंत असू शकतो.
जुनी गाडी इलेक्ट्रिक केल्यास मिळणारे फायदे व तोटे
या बदलाचे अनेक फायदे आहेत. EV चालवण्याचा खर्च कमी असतो, देखभाल खर्च घटतो आणि टेलपाइप उत्सर्जन शून्य असल्याने हवा स्वच्छ राहण्यास मदत होते. तसेच दिल्लीतील 10–15 वर्षांच्या वाहन मर्यादेपासून काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो.
मात्र, मोठ्या तांत्रिक बदलांमुळे सुरक्षितता, विश्वसनीयता, उच्च व्होल्टेज प्रणालीची जोखीम आणि रीसेल व्हॅल्यू कमी होण्याची शक्यता हे तोटेही लक्षात घ्यावे लागतात.













