Awake Navi : जर्मनीतील जगप्रसिद्ध बूट डसेलडोर्फ (Boot Düsseldorf) या मरीन शोमध्ये पाण्यावर चालणाऱ्या एका अनोख्या आणि अत्याधुनिक इलेक्ट्रिक वाहनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘Awake Navi’ असे या वाहनाचे नाव असून, ते दिसायला अगदी बाईकसारखे आहे.
मात्र ही बाईक रस्त्यावर नाही तर थेट पाण्याच्या लाटांवर हवेत तरंगत धावते. पारंपरिक बोट किंवा जेट-स्कीपेक्षा हे वाहन पूर्णपणे वेगळ्या तंत्रज्ञानावर आधारित आहे.

Awake Navi चे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यामधील हायड्रोफॉइल तंत्रज्ञान. ठराविक वेग गाठल्यानंतर वाहनाच्या खालच्या बाजूला असलेले फॉइल पाण्याचा दाब वापरून वाहनाला पृष्ठभागापासून काही फूट वर उचलतात.
त्यामुळे हे वाहन लाटांमधून न जाता लाटांच्या वरून उडत असल्यासारखे वाटते. यामुळे पाण्याचा अडथळा (ड्रॅग) मोठ्या प्रमाणात कमी होतो आणि प्रवास अत्यंत गुळगुळीत, स्थिर व आरामदायी होतो. लाटांचे धक्के अजिबात जाणवत नाहीत.
हे वाहन चालवणे अगदी बाईक चालवण्यासारखे सोपे आहे. हँडलवरील थ्रॉटल फिरवून वेग नियंत्रित करता येतो. यामध्ये रिव्हर्स गिअर, किल स्विच यांसारखी सुरक्षिततेची फीचर्स देण्यात आली आहेत. हँडलच्या मध्यभागी असलेली डिजिटल स्क्रीन नेव्हिगेशन, वेग आणि बॅटरीची संपूर्ण माहिती दाखवते.
Awake Navi ही पूर्णपणे इलेक्ट्रिक असल्यामुळे ती आवाज आणि कंपनाशिवाय चालते. मोठ्या XR4 बॅटरीवर ती एकदा पूर्ण चार्ज केल्यास सुमारे ३ तास, तर LR4 बॅटरीवर १.५ तासांपर्यंत चालू शकते. त्यामुळे पर्यावरणपूरक आणि शांत प्रवासाचा अनुभव मिळतो.
या वाहनाची बॉडी कार्बन कंपोझिट मटेरियलपासून बनवण्यात आली असून ती मजबूत आणि हलकी आहे. पंख दुमडता येण्यासारखे असल्याने कमी खोल पाण्यात किंवा वाहतुकीदरम्यान ती सहज वापरता येते.
Awake Navi मध्ये एक किंवा दोन जण प्रवास करू शकतात. विशेष फ्लोट ट्यूब बसवल्यास दोन प्रवासी आरामात बसू शकतात. याची कमाल वजन क्षमता २५० किलो आहे.
एकूणच, Awake Navi हे वाहन भविष्यातील जलवाहतुकीचे चित्र बदलणारे ठरत असून, लक्झरी, टेक्नॉलॉजी आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा नवा अनुभव देणारे आहे.













