पेट्रोलच्या वाढत्या किंमतीमुळे सध्या इलेक्ट्रीक स्कुटरची मागणी वाढली आहे. भारतीय बाजारपेठेत रोज नवनव्या माँडेलच्या स्कूटर दाखल होत आहेत. आता इलेक्ट्रिक दुचाकी खरेदी करण्याऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. मुंबईस्थित इलेक्ट्रिक दुचाकी कंपनी ओडिसीने त्यांची सर्वात परवडणारी इलेक्ट्रिक स्कूटर हायफाय लाँच केली आहे. त्याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत सुमारे ४२ हजार रुपये ठेवण्यात आली आहे. ही एक कमी गतीची इलेक्ट्रिक स्कूटर आहे जी विशेषतः शहरांमध्ये लहान प्रवासासाठी डिझाइन केली गेली आहे. कंपनीने माहिती दिली आहे की HyFy ची बुकिंग १० मे २०२५ पासून देशभरातील सर्व डीलरशिप आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर सुरू झाली.
बॅटरी पर्याय आणि श्रेणी
लाँन्च झालेली Odysse HyFy ही स्कूटर 48V आणि 60V अशा दोन बॅटरी पर्यायांसह येते. त्यात 250W इलेक्ट्रिक मोटरला देण्यात आली आहे. याचा टॉप स्पीड २५ किमी प्रति तास आहे. एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ही स्कूटर 70 ते 89 किलोमीटर धावू शकते. बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 4 ते 8 तास लागतात. या गाडीत लिथियम – आयन आणि ग्राफीन बॅटरी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. ज्यामुळे त्याची कार्यक्षमता चांगली आणि टिकाऊ होते.

कशी आहे गाडी
ही स्कूटर शहरातील रहदारी आणि अरुंद रस्ते लक्षात घेऊन डिझाइन करण्यात आली आहे. गर्दीच्या ठिकाणीही ती सहज चालवता येईल. यात क्रूझ कंट्रोल, एलईडी डिजिटल मीटर आणि दररोजच्या सामानासाठी चांगली बूट स्पेस देखील आहे. हायफाय पाच आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे. ज्यामध्ये रॉयल मॅट ब्लू, सिरेमिक सिल्व्हर, ऑरोरा मॅट ब्लॅक, फ्लेअर रेड आणि जेड ग्रीन असे रंग समाविष्ट आहेत.
आकार, ब्रेकिंग आणि सस्पेंशन
या गाडीची लांबी 1790 मिमी, रुंदी 750 मिमी आणि उंची 1165 मिमी आहे. त्याचा व्हीलबेस 1325 मिमी आणि ग्राउंड क्लीयरन्स 215 मिमी आहे. सीटची उंची 790 मिमी आहे. तिचे वजन 88 किलो आहे. समोर टेलिस्कोपिक फोर्क्स आणि मागील बाजूस मोनो-शॉक सस्पेंशन आहे. ब्रेकिंगसाठी समोर 130 मिमी डिस्क ब्रेक आणि मागील बाजूस ड्रम ब्रेक आहे.