Car Vip Number Process : भारतात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. आधी अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा होत्या, पण आता मानवाच्या गरजा या अधिक वाढल्या आहेत. मोबाईल आणि गाडी यांसारख्या वस्तू देखील आता मानवाच्या मूलभूत गरजांमध्येच येतात असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही.
मोबाईल आणि गाडी या दैनंदिन गरजांमध्ये समाविष्ट झाल्या आहेत. गाडी मग ती दुचाकी असो किंवा चार चाकी, लोक आपल्या गाडीवर खूपच प्रेम करतात. यामुळे लोक आपल्या गाडीसाठी वेगवेगळ्या गोष्टी करतात. काही लोक गाडी पूर्ण मॉडीफाय करतात.
तसेच अनेकजण आपल्या गाडीला युनिक नंबर असावा यासाठी व्हीआयपी नंबर घेतात. दरम्यान जर तुमचाही तुमच्या गाडीवर जीव असेल आणि तुम्ही तुमच्या गाडीसाठी एक व्हीआयपी नंबर घेण्याचा तयारीत असाल तर आजची बातमी तुमच्यासाठी खूपच कामाची ठरणार आहे. कारण की आता सरकारने गाडीसाठी चा व्हीआयपी नंबर मिळवण्याची पद्धत आणखी सोपी केली आहे.
आता वाहनांसाठीच्या व्हीआयपी नंबर साठी घरबसल्याच अर्ज करता येणार आहे. दरम्यान आज आपण ही अर्ज प्रोसेस नेमकी कशी असते तसेच यासाठी किती पैसे खर्च करावे लागतात ? यासंदर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
व्हीआयपी नंबर साठी कुठे अर्ज करावा लागणार?
जर तुम्हालाही तुमच्या वाहनासाठी व्हीआयपी नंबर हवा असेल तर यासाठी तुम्ही परिवहन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकणार आहात. परंतु ही सुविधा फक्त आणि फक्त महाराष्ट्र राज्यातील वाहनधारकांसाठी सुरू झाली आहे.
ही सुविधा 25 नोव्हेंबर 2024 पासून सुरू करण्यात आली असून यामुळे वाहनधारकांना आता आपल्या पसंतीचा नंबर लवकर मिळणार आहे आणि यासाठी ब्रोकरला अधिकचे पैसे देखील द्यावे लागणार नाहीत.
यामध्ये तुम्हाला प्रथम येणाऱ्यास प्रथम सेवा या तत्त्वावर नंबर प्लेट मिळणार आहे. महत्त्वाचे म्हणजे याच वेबसाईटवर वाहनधारकांना व्हीआयपी नंबरसाठी आवश्यक असणारे शुल्क भरता येणार आहे. आता आपण व्हीआयपी नंबर साठी किती पैसे लागतात या संदर्भात माहिती पाहणार आहोत.
व्हीआयपी नंबर साठी किती पैसे मोजावे लागणार
व्हीआयपी नंबर साठी वाहनानुसार आणि नंबर नुसार पैसे मोजावे लागतात. जर तुमच्याकडे चार चाकी वाहन असेल आणि तुम्हाला 1 नंबर हवा असेल तर यासाठी तब्बल सहा लाख रुपये मोजावे लागणार आहेत. जर तुमच्याकडे दुचाकी वाहन असेल आणि तुम्हाला 1 नंबर हवा असेल तर यासाठी तुम्हाला एक लाख रुपये मोजावे लागतील. एवढेच नाही तर 99, 999, 786, 9999 यांसारख्या नंबर्ससाठी 50,000 ते 2.5 लाख रुपये मोजावे लागू शकतात अशी खात्रीलायक बातमी एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे.
शिवाय, इतर जे व्हीआयपी नंबर आहेत त्यासाठी तुम्हाला 25,000 ते 1 लाख रुपये मोजावे लागणार आहेत. म्हणजेच व्हीआयपी नंबर साठी जवळपास 25 हजार रुपयांपासून ते सहा लाख रुपयांपर्यंत पैसे लागतात. तुमच्याकडे असणारे वाहन आणि तुम्हाला हवा असणारा व्हीआयपी नंबर यावरच या पैशांचे गणित अवलंबून राहते.