Maruti Suzuki Car Price Hike : भारतातील सर्वात मोठ्या कार उत्पादक कंपन्यांपैकी एक असलेल्या Maruti Suzukiने त्यांच्या गाड्यांच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 8 एप्रिल 2025 पासून या नवीन किमती लागू होणार असून, कंपनीच्या सात लोकप्रिय मॉडेल्सवर याचा परिणाम होणार आहे. याआधीही कंपनीने वर्षाच्या सुरुवातीला किमतीत वाढ केली होती, मात्र आता पुन्हा एकदा ही वाढ होणार आहे.
Maruti Suzuki ने सांगितले आहे की, कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमती आणि उत्पादन खर्च वाढल्यामुळे कंपनीला हा निर्णय घ्यावा लागत आहे. मागील काही महिन्यांपासून वाहन उद्योगात अनेक बदल होत आहेत. इलेक्ट्रिक आणि हायब्रिड वाहनांच्या वाढत्या मागणीमुळे पेट्रोल आणि डिझेल कार उत्पादक कंपन्यांवर दबाव वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर कंपनीने हा निर्णय घेतला आहे.

‘या’ 7 मॉडेल्सच्या किंमती वाढणार
Maruti Suzukiच्या सात प्रमुख गाड्यांच्या किमतीत वाढ होणार आहे. यामध्ये Fronx, Dzire Tour S, XL6, Ertiga, Wagon R, Eeco आणि Grand Vitara या मॉडेल्सचा समावेश आहे. या गाड्यांच्या किमतीत 2,500 रुपयांपासून 62,000 रुपयांपर्यंत वाढ होणार आहे. सर्वात कमी वाढ Fronx मॉडेलमध्ये होणार आहे, तर Grand Vitara ही SUV सर्वाधिक महाग होणार आहे.
ग्राहकांना मोठा झटका
Fronx आणि Dzire Tour S या गाड्यांची किंमत अनुक्रमे 2,500 रुपये आणि 3,000 रुपयांनी वाढणार आहे. XL6 आणि Ertiga या प्रीमियम MPV गाड्यांच्या किंमतीत 12,500 रुपयांची वाढ होईल. Wagon R ही लोकप्रिय हॅचबॅक 14,000 रुपयांनी महागणार आहे, तर व्यावसायिक वापरासाठी प्रसिद्ध असलेली Eeco 22,500 रुपयांनी महाग होणार आहे. Grand Vitara ही SUV तब्बल 62,000 रुपयांनी महाग होणार आहे, ज्यामुळे ही गाडी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा झटका बसणार आहे.
कंपनीने का केली दरवाढ ?
कंपनीने मार्च महिन्यातच संकेत दिले होते की, एप्रिलपासून किमतीत वाढ केली जाईल. गेल्या काही महिन्यांपासून कच्च्या मालाच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. यासोबतच उत्पादन खर्च आणि वाहतूक खर्च देखील वाढला आहे. त्यामुळे कंपनीने या वाढीचा काही भाग ग्राहकांवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
2025 हे वर्ष ग्राहकांसाठी किंमतवाढीच्या दृष्टीने कठीण ठरत आहे. Maruti Suzuki ने जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यातही आपल्या गाड्यांच्या किमती वाढवल्या होत्या. आता एप्रिलमध्ये ही तिसऱ्यांदा वाढ होत असल्यामुळे नवीन कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांना अतिरिक्त खर्च करावा लागणार आहे.