Electric Bike ओबेन इलेक्ट्रिक ही भारतातील एक महत्त्वाची इलेक्ट्रिक कंपनी मानली जाते. ही कंपनी सध्या त्यांच्या दुसऱ्या स्वदेशी इलेक्ट्रिक मोटरसायकलवर काम करत आहे. लवकरच ही मोटारसायकल भारतीय बाजारात दाखल होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ओ हंड्रेड (O100) नावाच्या या ई- बाईकला बेंगळुरूमध्ये विकसित करण्यात आले आहे. या बाईकद्वारे ओबेन कंपनी आता 100 सीसी मोटरसायकल श्रेणीत प्रवेश करणारआहे.
कशी असेल O100?
कंपनीने तरुणांना डोळ्यासमोर ठेऊन ओ हंड्रेड या मोटारसायकलची निर्मिती केली असल्याचे सांगितले जाते. तिची बाजारातील किंमत 1 लाखांपेक्षा कमी असेल, असा अंदाज आहे. दैनंदिन प्रवास करणाऱ्या भारतीय ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन या गाडीचे डिझाइन करण्यात आले आहे.

काय आहे नवीन?
तरुणांची गरज लक्षात घेता ओबेन इलेक्ट्रिकने उच्च क्षमतेची ओ हंड्रेड बाईक विकसित केली आहे. हे मॉडेल बहुमुखी डिझाइनसह तयार करण्यात आले आहे. ज्यामुळे ते ग्राहकांच्या आवडीनुसार अनेक प्रकार, बॅटरी पर्याय आणि वैशिष्ट्यांना समर्थन देते. त्यात नवीन तंत्रज्ञान आणि ईव्ही चार्जिंग सारख्या पायाभूत सुविधा सहजपणे जोडता येणार आहेत.
शोरुमही उघडणार?
ओबेन इलेक्ट्रिक भारतातील टियर 1, टियर 2 आणि टियर 3 शहरांमध्ये त्यांचे शोरूम नेटवर्क वेगाने वाढवत आहेत. वर्अखेरीस कंपनी सुमारे 100 शहरांत आपले शोरुम उघडणार आहेत. डिलर्सचा नफा लक्षात घेऊन कंपनी पावले उचलत असल्याचे सांगितले जाते.
कधी येणार बाजारात
ओबेनने आपली पहिली एआरएक्स बाईक बाजारात आणली होती. या बाइक्सनी उत्कृष्ट कामगिरी केल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. आता कंपनी आपली दुसरी O100 मोटारसायकल येत्या चार-पाच महिन्यांत बाजारात आणेल, असे सांगितले जात आहे.