Electric Scooter : भारतीय ऑटोमोबाईल बाजारात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढत असताना, आता यामाहा मोटरनेही या स्पर्धेत अधिकृत प्रवेश केला आहे. इंडिया यामाहा मोटर (IYM) प्रा. लि.ने भारतातील आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर EC-06 सादर करत इलेक्ट्रिक दुचाकी सेगमेंटमध्ये मोठा टप्पा गाठला आहे.
कंपनीने या स्कूटरची एक्स-शोरूम (दिल्ली) किंमत 1 लाख 67 हजार 600 रुपये जाहीर केली असून, सुरुवातीला ती निवडक शहरांमधील यामाहाच्या प्रीमियम Blue Square शोरूम्समध्ये उपलब्ध होणार आहे.

EC-06 ही आधुनिक डिझाइन आणि मजबूत बॉडी स्टान्ससह सादर करण्यात आली आहे. यामाहाच्या पारंपरिक डीएनएला साजेसे स्टायलिंग आणि तरुणांना आकर्षित करणारा लूक ही या स्कूटरची प्रमुख ओळख आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, ही स्कूटर एका चार्जमध्ये 169 किमी प्रमाणित रेंज देते, त्यामुळे दैनंदिन शहरी प्रवासासाठी ती एक उत्तम पर्याय ठरणार आहे.
या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये IPMSM मोटर आणि 4 kWh फिक्स्ड बॅटरी देण्यात आली आहे. या सेटअपमुळे स्कूटरला 79 किमी प्रतितास टॉप स्पीड, 26 Nm टॉर्क आणि 6.7 kW पॉवर मिळते. बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी सुमारे 8 तासांचा वेळ लागतो. तसेच, बॅटरीवर 3 वर्षे किंवा 30,000 किमी वॉरंटी देण्यात येत आहे.
रायडिंग अनुभव अधिक चांगला करण्यासाठी EC-06 मध्ये Eco, Standard आणि Power असे तीन रायडिंग मोड्स देण्यात आले आहेत. याशिवाय, रिव्हर्स मोड, टेलिस्कोपिक फ्रंट सस्पेन्शन, रिअर कॉईल स्प्रिंग सस्पेन्शन, 200 मिमी फ्रंट व रिअर डिस्क ब्रेक्स आणि CBS (Combined Braking System) यांसारखी सुरक्षा व सोयीची फीचर्सही उपलब्ध आहेत.
फीचर्सच्या बाबतीतही ही स्कूटर प्रगत आहे. यात डिजिटल कलर LCD डिस्प्ले, LED हेडलाइट्स व टेललाइट्स, तसेच Yamaha Motor Connect R ॲपद्वारे कनेक्टेड फीचर्स देण्यात आले आहेत. याशिवाय, सीटखाली 24.5 लिटर स्टोरेज स्पेस उपलब्ध आहे.
यामाहा मोटर इंडिया ग्रुपचे अध्यक्ष हाजीम ओटा यांनी सांगितले की, EC-06 ही शाश्वत शहरी मोबिलिटीच्या दिशेने यामाहाचे महत्त्वाचे पाऊल असून, भारताच्या कार्बन-न्यूट्रल भविष्यासाठी कंपनी पूर्णपणे कटिबद्ध आहे. EC-06 मुळे ओला, अॅथरसारख्या कंपन्यांना आता यामाहाचीही तगडी स्पर्धा मिळणार आहे.













