Hyundai Creta : भारतात वाहन खरेदीचा वेग दिवसेंदिवस वाढत असून 2025 या वर्षात बहुतांश वाहन उत्पादक कंपन्यांनी विक्रीत लक्षणीय वाढ नोंदवली आहे. ग्राहकांची बदलती आवड लक्षात घेऊन कार कंपन्या केवळ सवलतीच देत नाहीत, तर आरामदायी, सुरक्षित आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज अशी नवी मॉडेल्सही बाजारात आणत आहेत.
याच पार्श्वभूमीवर भारतातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या SUV पैकी एक असलेली Hyundai Creta आता नव्या रूपात येण्यासाठी सज्ज झाली आहे.

थर्ड जनरेशन Hyundai Creta ची चाचणी अधिकृतपणे सुरू झाली असून, दक्षिण कोरियामधील टेस्टिंगदरम्यानचे काही फोटो समोर आले आहेत. या नव्या Creta ला पुढील वर्षी भारतीय बाजारात लॉन्च करण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे, ही SUV सध्याच्या मॉडेलपेक्षा आकाराने थोडी मोठी आणि डिझाइनच्या बाबतीत अधिक शार्प असणार आहे. Kia Seltos च्या नवीन पिढीप्रमाणेच Creta च्या लांबी आणि रुंदीमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नवीन Creta मध्ये पुढे झुकलेली विंडस्क्रीन, अधिक सरळ स्टान्स, 18-इंचाचे मोठे टायर, रूफ स्पॉयलर तसेच लहान फ्रंट आणि रिअर ओव्हरहँग्स दिसू शकतात. याशिवाय, व्हीलबेस थोडा वाढवल्यामुळे केबिनमध्ये अधिक जागा आणि प्रवाशांसाठी जास्त आराम मिळेल, असा अंदाज आहे.
इंजिनच्या बाबतीत मोठे बदल अपेक्षित नसले तरी सध्याचे यशस्वी पर्याय कायम राहतील. यात 1.5-लिटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल, 1.5-लिटर टर्बो पेट्रोल आणि 1.5-लिटर टर्बो डिझेल इंजिनचा समावेश असेल. मॅन्युअलसोबतच CVT, ऑटोमॅटिक आणि DCT गिअरबॉक्सचे पर्यायही उपलब्ध राहतील.
महत्त्वाची बाब म्हणजे 2027 मध्ये Hyundai Creta चा हायब्रीड अवतारही बाजारात येण्याची शक्यता आहे. 1.5-लिटर पेट्रोल इंजिनसोबत हायब्रीड तंत्रज्ञान देण्यात येणार असून, यामुळे मायलेजमध्ये मोठी सुधारणा होईल.
2015 मध्ये पहिल्यांदा लॉन्च झालेल्या Creta ने भारतीय बाजारात SUV सेगमेंटमध्ये क्रांती घडवली. प्रीमियम डिझाइन, भरगच्च फीचर्स आणि विश्वासार्हतेमुळे Creta ने जुलै 2025 पर्यंत 1.2 दशलक्ष युनिट्सची विक्री पूर्ण केली आहे. आता नव्या पिढीतील Creta कडून ग्राहकांच्या अपेक्षा आणखी वाढल्या आहेत.













