Maruti Invicto vs Fortuner:- भारतीय बाजारात मोठ्या एसयूव्ही आणि एमपीव्ही गाड्यांची मागणी झपाट्याने वाढत आहे. टोयोटा फॉर्च्युनर ही त्याच्या दमदार रोड प्रेझेन्स आणि मजबूत इंजिनसाठी प्रसिद्ध आहे. मात्र तिची जास्त किंमत अनेकांना परवडणारी नसते. अशा परिस्थितीत तुम्हाला फॉर्च्युनरएवढी मोठी पण किफायतशीर किंमतीत उपलब्ध होणारी कार हवी असल्यास मारुती सुझुकी इन्विक्टो हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. इन्विक्टो ही टोयोटा फॉर्च्युनरइतकीच उंच आणि प्रशस्त आहे.पण तिची किंमत निम्म्याहूनही कमी आहे.
कसे आहे डायमेन्शन?
![maruti invicto](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/gi.jpg)
मारुती सुझुकी इन्विक्टो ही 7 आणि 8-सीटर अशा दोन व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे.तर टोयोटा फॉर्च्युनर केवळ 7-सीटर पर्यायामध्येच मिळते. या दोन्ही गाड्या आकाराने मोठ्या असल्या तरी त्यांचे परिमाण वेगळे आहेत.
इन्विक्टोची लांबी 4,755 मिमी, रुंदी 1,850 मिमी आणि उंची 1,798 मिमी आहे. दुसरीकडे, फॉर्च्युनरची लांबी 4,795 मिमी, रुंदी 1,855 मिमी आणि उंची 1,835 मिमी आहे. त्यामुळे फॉर्च्युनर ही थोडी मोठी असली तरी दोन्ही गाड्या जवळपास सारख्याच आहेत.
कारच्या बूट स्पेसचा विचार केला तर फॉर्च्युनरमध्ये 296 लीटर जागा उपलब्ध आहे तर इन्विक्टोमध्ये 239 लीटर जागा मिळते. त्यामुळे मोठ्या सामानासाठी फॉर्च्युनर अधिक चांगली ठरते. मात्र जर तुम्हाला फक्त प्रशस्तता आणि बजेटमध्ये एक आरामदायक कार हवी असेल तर इन्विक्टो हा उत्तम पर्याय असू शकतो.
इंजिन आणि मायलेज
मारुती सुझुकी इन्विक्टोमध्ये 2.0-लीटर पेट्रोल इंजिनसह हायब्रिड तंत्रज्ञान देण्यात आले आहे. हे इंजिन 152 बीएचपी पॉवर आणि 188 एनएम टॉर्क जनरेट करते. याशिवाय या गाडीचे मायलेज 23.24 किमी/लीटर असल्याचा दावा कंपनीने केला आहे. जो मोठ्या आकाराच्या कारसाठी प्रभावी मानला जातो.
याउलट टोयोटा फॉर्च्युनरच्या पेट्रोल व्हेरियंटमध्ये 2694 सीसीचे ड्युअल व्हीव्हीटी-आय इंजिन आहे. जे 166 बीएचपी पॉवर आणि 245 एनएम टॉर्क निर्माण करते. मायलेजच्या बाबतीत फॉर्च्युनर इन्विक्टोपेक्षा कमी आहे. तिचे पेट्रोल व्हेरियंट 10 किमी/लीटर तर डिझेल व्हेरियंट 14.27 किमी/लीटर मायलेज देते. त्यामुळे जर तुम्हाला मोठ्या गाडीतही मायलेज महत्त्वाचे असेल.तर इन्विक्टो अधिक फायदेशीर ठरू शकते.
सुरक्षा आणि आधुनिक फीचर्स
सुरक्षेच्या दृष्टीने दोन्ही गाड्या उत्तम आहेत. मारुती सुझुकी इन्विक्टोमध्ये 6 एअरबॅग्स, 360-डिग्री कॅमेरा, फ्रंट-रियर पार्किंग सेन्सर, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, चाइल्ड सीट आयसोफिक्स सपोर्ट आणि व्हेईकल स्टेबिलिटी कंट्रोल यांसारखी आधुनिक सुरक्षा वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.
दुसरीकडे टोयोटा फॉर्च्युनरमध्ये अधिक प्रीमियम सुरक्षा फीचर्स देण्यात आली आहेत. यात 7 एअरबॅग्स, व्हेईकल स्टेबिलिटी कंट्रोल, ईबीडीसह एबीएस, हिल असिस्ट कंट्रोल, इमर्जन्सी ब्रेक सिग्नल, स्पीड ऑटो लॉकसह इमर्जन्सी अनलॉक आणि अँटी-थेफ्ट अलार्म असे फीचर्स दिले आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने फॉर्च्युनर थोडी सरस ठरते.
किंमत आणि कोणता पर्याय चांगला?
मारुती सुझुकी इन्विक्टोची एक्स-शोरूम किंमत 25.51 लाख रुपयांपासून सुरू होते आणि टॉप व्हेरियंटसाठी 29.22 लाख रुपयांपर्यंत जाते. दुसरीकडे टोयोटा फॉर्च्युनरच्या बेस व्हेरियंटची किंमत 33.78 लाख रुपये आहे.तर टॉप व्हेरियंटसाठी 51.94 लाख रुपयांपर्यंत किंमत जाते.
जर तुम्हाला दमदार रोड प्रेझेन्स आणि प्रीमियम लुकसह अधिक सुरक्षित आणि पॉवरफुल एसयूव्ही हवी असेल तर टोयोटा फॉर्च्युनर एक उत्तम पर्याय ठरू शकते. मात्र तुम्हाला कमी किंमतीत चांगल्या मायलेजसह मोठ्या गाडीचा अनुभव घ्यायचा असेल तर मारुती सुझुकी इन्विक्टो हा जास्त फायदेशीर पर्याय ठरतो.