Cheapest 6-Seater Car | भारतात 7-सीटर आणि 6-सीटर कार्सच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. कुटुंबासाठी परवडणाऱ्या आणि जागा पुरवणाऱ्या कार्ससाठी ग्राहकांचा कल वाढत चालला आहे. याच पार्श्वभूमीवर देशातील आघाडीच्या कार निर्माता कंपनीने एक मोठं पाऊल उचललं आहे. मारुती सुझुकीने आपली लोकप्रिय कार Eeco आता 6-सीटर अवतारात सादर केली असून, ही कार सध्या भारतातील सर्वात स्वस्त 6-सीटर म्हणून ओळखली जात आहे.
पूर्वी ईको ही 7-सीटर पर्यायात उपलब्ध होती, परंतु आता ती आवृत्ती बंद करण्यात आली असून, त्याऐवजी 6-सीटर मॉडेल सादर करण्यात आलं आहे. महत्त्वाचं म्हणजे या नव्या व्हर्जनमध्ये कॅप्टन सीट्सचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवास अधिक आरामदायक होणार आहे. कॅप्टन सीट्स ही सुविधा या सेगमेंटमध्ये अत्यंत दुर्मिळ आहे, जी सामान्यतः महागड्या एमपीव्हीमध्येच दिसते.

जबरदस्त सेफ्टी अपडेट-
मारुतीने केवळ आसन व्यवस्थेतच नाही, तर कारच्या सुरक्षाव्यवस्थेतही मोठा बदल केला आहे. आता या नवीन ईको मॉडेलमध्ये 6 एअरबॅग्ज स्टँडर्ड देण्यात आलेल्या आहेत. कंपनीने गेल्या काही महिन्यांपासून आपल्या गाड्यांमध्ये 6 एअरबॅग्ज स्टँडर्ड करण्याचे धोरण स्वीकारले आहे आणि ईको त्याचाच एक भाग आहे. त्यामुळे ही गाडी आता पूर्वीपेक्षा जास्त सुरक्षित ठरते.
तांत्रिक बाबीकडे पाहिल्यास, नवीन ईकोमध्ये पूर्वीसारखंच 1.2 लिटर नैसर्गिक आस्पिरेटेड पेट्रोल इंजिन वापरण्यात आलं आहे. हे इंजिन 80bhp पॉवर आणि 104Nm टॉर्क निर्माण करतं आणि 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह येतं. CNG व्हेरिएंटसाठी मात्र सध्या 5-सीटर पर्याय कायम ठेवण्यात आला आहे.
किंमत
किंमतीच्या बाबतीत ही कार आणखी आकर्षक ठरते. नवीन 6-सीटर ईकोची किंमत सध्या ₹7 लाख (ऑन-रोड, मुंबई) दरम्यान आहे. ही किंमत जुन्या 7-सीटर व्हेरिएंटच्या तुलनेत सुमारे ₹26,000 ने जास्त आहे. कंपनीने इतर व्हेरिएंट्सच्या किंमती वाढवल्या आहेत का, याबाबत अद्याप माहिती दिलेली नाही.
साधारणतः पूर्वीच्या मॉडेलसारखेच फीचर्स आणि सेटअप या नव्या गाडीत असून, मुख्य बदल आसन व्यवस्था आणि सुरक्षा व्यवस्थेत केला गेला आहे. मारुती ईको ही आजही देशातील छोट्या व्यावसायिक वापरापासून ते कुटुंबासाठी वापरण्यात येणाऱ्या गाड्यांपर्यंत एक विश्वासार्ह पर्याय मानली जाते. आता ही कार अधिक सुरक्षित आणि आरामदायक बनली असून, कमी बजेटमध्ये 6-सीटर कार शोधणाऱ्यांसाठी ही एक उत्तम निवड ठरू शकते.