Ola Electric Car : ओला पुढील वर्षी भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक कार आणण्याचा विचार करत असून कंपनीचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी या इलेक्ट्रिक कारचा नवीन टीझर जारी केला आहे. भाविशने ट्विट करून टीझर रिलीज केला आहे. तसेच आम्ही भारतातील सर्वात स्पोर्टी कार बनवणार आहोत. असे देखील म्हंटले आहे.
शेअर केलेल्या टीझरमध्ये कारबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही पण ती सेडान सारखी दिसत आहे. कारचा आकार सेडानसारखा दिसतो आहे आणि पूर्वी शेअर केलेल्या टीझरमध्येही याची पुष्टी झाली आहे. आतापर्यंत कंपनीने या कारबद्दल कोणतीही तांत्रिक माहिती दिलेली नाही पण ती 2023 मध्ये आणणार असल्याचे सांगितले आहे.


या टीझरसह, कंपनीचे सीईओ, भाविश अग्रवाल म्हणाले की, ही देशातील आतापर्यंतची सर्वात स्पोर्टी कार असणार आहे. अशा प्रकारे ओलाकडून मोठा दावा करण्यात येत आहे. सध्या टाटा मोटर्स, महिंद्रा सारख्या कंपन्या इलेक्ट्रिक SUV वर लक्ष केंद्रित करत आहेत पण असा दावा अजून कोणी केलेला नाही.
यापूर्वी, कंपनीच्या एका कार्यक्रमात, सीईओ भाविश अग्रवाल यांनी सांगितले होते की ते आगामी इलेक्ट्रिक कारचे इतर तपशील 15 ऑगस्ट रोजी उघड करतील आणि ग्राहक ही ई-कार कधी बुक करू शकतात. हे देखील यात सांगण्यात येणार आहे. त्यांनी अनेकदा ट्विट करून सांगितले आहे की, ही कार पुढच्या वर्षी म्हणजेच 2023 मध्ये येईल.

कंपनीने या इलेक्ट्रिक कारची तयारी सुरू केली होती. चार्जिंगसाठी, कंपनीने स्टोअरडॉटमध्ये गुंतवणूक केली आहे, जी एक्स्ट्रीम फास्ट-चार्जिंग (XFC) तंत्रज्ञानासह बॅटरीजमध्ये आघाडीवर आहे. ओला इलेक्ट्रिकने नियोजित केलेल्या अनेक जागतिक धोरणात्मक गुंतवणुकीपैकी स्टोअरडॉटमधील गुंतवणूक ही पहिली गुंतवणूक आहे, कारण ती प्रगत सेल केमिस्ट्री आणि मॅन्युफॅक्चरिंग, तसेच इतर बॅटरी तंत्रज्ञान आणि नवीन ऊर्जा प्रणालींमध्ये आपला गाभा वाढवणार आहे.
काही काळापूर्वी त्यांनी म्हटले होते की इलेक्ट्रिक वाहन उद्योग पूर्णपणे कार्बनमुक्त नाही. लिथियम, निकेल आणि कोबाल्टपासून बनवलेल्या बॅटरी देखील कार्बन उत्सर्जित करतात, परंतु ते हायड्रोजनच्या तुलनेत किफायतशीर आहेत. हायड्रोजन कार तयार करण्याच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे सांगितले, यावरून असे दिसून येते की ते फक्त इलेक्ट्रिक कार विकसित करणार आहेत.

कंपनीच्या S1 इलेक्ट्रिक स्कूटरला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे आणि सीईओ भावीशला इलेक्ट्रिक मोबिलिटीला उज्ज्वल भविष्याचा विश्वास आहे परंतु सध्या ओला इलेक्ट्रिकने विद्यमान ग्राहकांना स्कूटर वितरित करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि बाजारात एक विश्वासार्ह नाव प्रस्थापित केले पाहिजे. त्यानंतर इलेक्ट्रिक कार आणावी. असे मत अनेकांचे आहे.













