Pod Taxi : मुंबई-पुण्यासारख्या शहरांत वर्दळ वाढली आहे. रस्ते, उड्डाणपूल, मेट्रो, लोकल अशा सगळ्या सुविधा असूनही त्या कमी पडत आहेत. गर्दी वाढल्याने वाहतूक कोंडी वाढली आहे. याच वाहतूक कोंडीवर पर्याय म्हणून हवाई (पॉड) टॅक्सीचा प्रयोग केला जाणार आहे. ठाणे शहरात ही सेवा लवकर सुरु करण्यात येणार आहे. ठाणे महानगर पालिकेकडे याबाबतचे सर्वेक्षण करण्याची परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
ठाण्यात सुरु होणार हवाई टॅक्सी
ठाणे शहराची लोकसंख्या सध्या जवळपास 25 लाखांच्या पुढे गेली आहे. या शहरांत ट्रॅफीक जॅमची समस्या मोठ्या प्रमाणात आहे. ठाण्यातील रस्ते वाहतुकीवरील कोंडी दूर करण्यासाठी हवाई टॅक्सीचा प्रयोग राबवण्यात येणार आहे. वडाळा ते गायमुख हा मेट्रो मार्ग पुढील वर्षापर्यंत सुरू होणार आहे. ठाणे शहरातील कापूरबावडी ते गायमुख परिसरात मेट्रोला कनेक्टिव्हिटी देण्याच्या दृष्टीने हवाई टॅक्सी हा एक उत्तम पर्याय असू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.

कुठे सुरु होणार हवाई टॅक्सी?
हवाई (पॉड) टॅक्सीचा प्रयोग ठाणे व मीरा-भाईंदर पालिका क्षेत्रामध्ये राबवण्याचा सरकारचा मानस आहे. ठाणे शहरात हवाई टॅक्सीसंदर्भात सर्वेक्षण करण्यात येणार आहे. घोडबंदर रोडवरील भाईंदर पाडा येथे विहंग हिल्स परिसरातील 40 मीटर रस्त्यावर हा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर राबवण्यात यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
काय आहे पॉड टॅक्सी?
पॉड टॅक्सी ही इलेक्ट्रिक वाहन असून ते चालकविरहित वाहतुकीचे साधन आहेत. या छोट्या ऑटोमेटेड कार आहेत, ज्या मूठभर प्रवाशांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जास्त वेगाने नेण्यासाठी डिझाइन केल्या आहेत. वांद्रे ते कुर्ला स्थानका दरम्यान वांद्रे कुर्ला संकुलामधून पॉड टॅक्सी धावणार असून त्याचे अंतर 8.80 कीमी एवढी आहे. त्यामध्ये 38 स्थानके असणार आहेत. प्रति पॉड सहा प्रवाशी एवढी त्याची क्षमता आहे. कमाल 40 किमी प्रति तास एवढा त्याचा वेग असणार आहे. याप्रकल्पामुळे वांद्रे स्थानक ते बीकेसी हा प्रवास अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे.