Renault Duster चे दमदार पुनरागमन! आजपासून बुकिंग सुरू; स्ट्राँग हायब्रिडसह 3 इंजिन पर्याय, ADAS आणि प्रीमियम फीचर्सची रेलचेल

Published on -

Renault Duster Launch : भारतीय SUV बाजारात एकेकाळी क्रांती घडवणारी Renault Duster पुन्हा एकदा नव्या अवतारात दाखल झाली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर रेनॉल्टने चेन्नईतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये नव्या डस्टरचे भव्य अनावरण केले. आजपासून या SUV ची अधिकृत बुकिंग सुरू झाली असून इच्छुक ग्राहक 21,000 रुपयांच्या टोकन अमाउंटवर बुकिंग करू शकतात.

2012 मध्ये SUV म्हणजे लक्झरी अशी समजूत मोडत डस्टरने मध्यमवर्गाला SUV चे स्वप्न प्रत्यक्षात आणून दिले होते. आता जवळपास दीड दशकानंतर, तीच डस्टर अधिक प्रीमियम, अधिक टेक्नॉलॉजी-लोडेड आणि पर्यावरणपूरक पर्यायांसह परतली आहे.

रेनॉल्ट इंडिया व्यवस्थापनानुसार, नवीन डस्टर ही रेनो ग्रुप मॉड्युलर प्लॅटफॉर्म (RGMP) वर आधारित असून ती खास भारतीय बाजारासाठी विकसित करण्यात आली आहे. यामध्ये तब्बल 90 टक्के देशांतर्गत घटकांचा वापर करण्यात आला आहे, ज्यामुळे किंमत स्पर्धात्मक ठेवण्यास मदत होणार आहे.

लुक आणि डिझाइन

नव्या डस्टरला अधिक रग्ड आणि मस्क्युलर लुक देण्यात आला आहे. LED हेडलॅम्प्स, आयब्रो-शेप DRL, ‘DUSTER’ बॅजिंग असलेली फ्रंट ग्रिल, पिक्सेल-डिझाइन फॉग लॅम्प्स आणि ब्लॅक क्लॅडिंगमुळे SUV चा दमदार स्वभाव ठळकपणे दिसतो. मागील बाजूस LED टेललाइट्स लाइट बारने जोडलेल्या असून स्पोर्टी टच देतात.

तीन इंजिन पर्याय

नव्या डस्टरमध्ये तीन इंजिन पर्याय देण्यात आले आहेत. यामध्ये 1.8 लीटर स्ट्राँग हायब्रिड ई-टेक पेट्रोल इंजिन प्रमुख आकर्षण आहे. 1.4 kWh बॅटरीसह हे इंजिन शहरात 80 टक्क्यांपर्यंत EV मोडमध्ये चालू शकते. याशिवाय 1.3 लीटर टर्बो पेट्रोल (TCe 160) आणि 1.0 लीटर टर्बो पेट्रोल इंजिनचे पर्याय उपलब्ध असतील.

इंटीरियर आणि फीचर्स

डस्टरचे केबिन आता अधिक प्रीमियम बनले आहे. लेदरेट सीट्स, 10.1 इंच टचस्क्रीन, 10.25 इंच डिजिटल क्लस्टर, पॅनोरामिक सनरूफ, वायरलेस चार्जर, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल, 360 डिग्री कॅमेरा, 6 एअरबॅग्स आणि लेव्हल-2 ADAS यांसारखी फीचर्स देण्यात आली आहेत. भारतात ADAS मिळणारी ही रेनॉल्टची पहिली कार ठरणार आहे.

किंमत आणि डिलिव्हरी

कंपनी मार्चच्या मध्यात किमती जाहीर करणार असून एप्रिलच्या मध्यापासून डिलिव्हरी सुरू होईल. स्ट्राँग हायब्रिड व्हेरिएंटसाठी मात्र ग्राहकांना दिवाळीपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. एकंदरीत, नवीन Renault Duster पुन्हा एकदा SUV सेगमेंटमध्ये मोठी खळबळ उडवण्यासाठी सज्ज झाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe