Tata Sierra : टाटा मोटर्स लवकरचं बाजारात मोठा धमाका करण्याच्या तयारीत आहे. खरे तर कंपनीची एक बहुचर्चित आणि प्रतिष्ठित एसयूव्ही येत्या 25 तारखेला लॉन्च होणार आहे. 25 नोव्हेंबर रोजी कंपनी त्यांची सिएरा एसयूव्ही लाँच करणार असल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे.
दरम्यान ही बहु चर्चित एसयूव्ही लॉन्च होण्याआधीच धुमाकूळ घालू पाहत आहे. कारण SUV लाँच होण्यापूर्वी, टाटा मोटर्सने एक नवीन व्हिडिओ रिलीज केला आहे. या व्हिडिओला प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळतोय.

या विडिओमध्ये एसयूव्हीला आतून आणि बाहेरून शोकेस करण्यात आले आहे. व्हिडिओ केवळ जुन्या सिएराच्या आठवणींना उजाळा देत नाही तर हे मॉडेल आधुनिक भविष्यासाठी तयार आहे हे पण ठणकावून सांगत आहे.
टाटा मोटर्स कार्सच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या सुरुवातीला एक लहान मुलगा दाखवला जातो जो की खिडकीतून गाडी पाहतो. हा Video दुसऱ्या पिढीच्या सिएरापासून सुरू होतो.
तीन-दरवाज्यांच्या डिझाइनमुळे आणि मोठ्या, मागील बाजूस झुकलेल्या काचमुळे ती लगेच ओळखता येते. ही पांढरी क्लासिक सिएरा मुंबईच्या रस्त्यांवरून, बॉम्बे टॉकीज आणि स्थानिक हॉटेलसारख्या परिचित ठिकाणांमधून प्रवास करते.
हे दृश्य 1990 च्या दशकाची आठवण करून देते. व्हिडिओमध्ये दिसणारी 2025 टाटा सिएरा ही गाडी फारच क्लासिक, मजबूत आणि आकर्षक दिसत आहे. गाडीचा आकार फारच क्लिअर, बॉक्सी टाईप आहे.
टाटा मोटर्सने आपल्या भूतकाळातील गाडीला एक नवीन रूप देण्याचा प्रयत्न केला आहे. कंपनीने या गाडीत जुन्या गोष्टी आणि भविष्यातील स्टाइलिंग एकत्र केली आहे. यामुळे जुन्या आठवणीना उजाळा मिळालाय. सोबत ही गाडी पूर्णपणे मॉडर्न बनवण्यात आली आहे.
बाहेरून या गाडीत कनेक्टेड एलईडी डीआरएल स्ट्रिप, स्प्लिट एलईडी हेडलाइट्स, “सिएरा” बॅजिंगसह काळी ग्रिल, दोन्ही बंपरवर सिल्व्हर स्किड प्लेट्स, व्हील आर्च आणि दरवाजावर ग्लॉस ब्लॅक क्लॅडिंग आणि मोठे 19 इंच अलॉय व्हील्स राहणार आहेत.
व्हिडिओमध्ये सिएराचे इंटेरियर सुद्धा दाखवण्यात आले आहे. इंटेरियर मध्ये तीन स्क्रीन डॅशबोर्ड देण्यात आले आहे. हे गाडीचे एक मुख्य आकर्षण आहे. जे की एसयूव्हीचे मॉडर्न फिचर्स दाखवते.
यात आकर्षक सेंट्रल एसी व्हेंट्स आणि हॅरियर पासून इन्स्पायर्ड झालेले कंट्रोल पॅनल, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक आणि गियर सिलेक्टर देखील आहेत. यात पॅनोरॅमिक सनरूफ आणि अॅडजस्टेबल हेडरेस्टसह बेंच-स्टाईल रीअर सीट्स देखील आहेत.
टाटा मोटर्सने आधीच घोषणा केली आहे की सिएरामध्ये अनेक इंजिन पर्याय असतील. अनेक नवीन टाटा वाहनांप्रमाणे, 2025 सिएरा इलेक्ट्रिक, पेट्रोल आणि डिझेल इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध राहणार आहे.













