Mahindra XUV 7XO : नव्याने कार खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी आज एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ही बातमी महिंद्राची एसयूव्ही खरेदी करणाऱ्यांसाठी खास ठरणार आहे. महिंद्राने आज भारतीय कार मार्केटमध्ये XUV700 ची अपडेटेड आवृत्ती लाँच केली आहे. हा लाँचिंग इव्हेंट संध्याकाळी संपन्न झाला. या एसयूव्हीला XUV 7XO असे नाव देण्यात आले आहे. या अपडेटसह, एसयूव्हीच्या एक्सटेरियर आणि इंटेरियर मध्ये काही कॉस्मेटिक अपग्रेड्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. नव्या एसयूव्हीमध्ये काही नवीन तंत्रज्ञानाने परिपूर्ण फीचर्स सुद्धा आहेत.
मंडळी, महिंद्रा XUV700 ही गाडी पहिल्यांदा 2021 मध्ये लाँच करण्यात आली होती. ही गाडी कंपनीची सर्वाधिक लोकप्रिय आणि यशस्वी गाड्यांपैकी एक ठरली. आजही अनेक जण या गाडीचे चाहते आहेत. दरम्यान ही सुपरहिट गाडी XUV500 वर आधारित आहे. कंपनीची एक्सयूव्ही 500 सुद्धा एक सुपरहिट गाडी होती. ही कंपनीची मोनोकोक चेसिसवर बनवलेली पहिली SUV होती. आता, कंपनी याच आपल्या लेगसीमध्ये नवीन मॉडेल जोडत आहे. XUV 7XO आज अधिकृतरित्या भारतीय ग्राहकांसाठी लाँच करण्यात आली आहे.

ही नवीन गाडी XUV700 ची अपडेटेड आवृत्ती आहे. दरम्यान ब्रँडकडून नव्याने लॉन्च झालेली ही एसयूव्ही टाटा सफारी, ह्युंदाई अल्काझार, टोयोटा इनोव्हा हायक्रॉस, एमजी हेक्टर प्लस आणि मारुती सुझुकी इन्व्हिक्टो यांच्याशी स्पर्धा करणार आहे. 2026 ची महिंद्रा एसयूव्ही, मुळात XUV700 चे फेसलिफ्ट मॉडेल आहे. पण XUV300 चे अपडेटेड मॉडेल XUV 3XO नंतर ही ब्रँडची दुसरी अशी गाडी आहे जी नवीन नाव वापरणार आहे. आता आपण या गाडीच्या एक्सटेरियर आणि इंटेरियर बद्दल माहिती पाहुयात.
डिझाइन आणि गाडीचे एक्सटेरियर कसे आहे?
नवीन XUV 7XO च्या डिझाईन बाबत बोलायचं झालं तर यात महिंद्राच्या लेटेस्ट Born EVs जसे की XEV 9S आणि XEV 9E मधील काही डिझाइन एलिमेंट्स पाहायला मिळतात. समोरच्या बाजूला बूमरँग-आकाराचे DRLs, ट्रॅपेजॉइडल LED हेडलॅम्प्स आणि सुधारित फ्रंट ग्रिल देण्यात आली आहे. बाजूचा प्रोफाइल मोठ्या प्रमाणात XUV700 सारखाच ठेवण्यात आला असला, तरी नवीन अलॉय व्हील्स SUV ला अधिक प्रीमियम लूक देतात. मागील बाजूस कनेक्टेड LED टेल-लाइट्स, हेक्सागोनल डिटेलिंग आणि नवीन बंपरमुळे कार अधिक आधुनिक दिसते.
इंटीरियर कसे आहे?
आता आपण गाडीच्या इंटिरियर कडे वळूयात. गाडीच्या इंटेरियरमध्ये सर्वात मोठा बदल म्हणजे नव्या गाडीच्या केबिनमध्ये आपल्याला नवीन ट्रिपल-स्क्रीन सेटअप नजरेस पडतोय जो गाडीला पूर्णपणे एक नवीन आणि अगदीच प्रीमियम लुक देतो. यात डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि फ्रंट पॅसेंजरसाठी स्वतंत्र स्क्रीन सुद्धा आहे. याशिवाय, नवीन टू-स्पोक स्टीअरिंग व्हील आणि टच-पॅनल HVAC कंट्रोल्ससह रीडिझाइन केलेला सेंटर कन्सोल सुद्धा आहे.
गाडीचे टॉप फीचर्स कोणते ?
या नव्या गाडीमध्ये तुम्हाला अनेक नवीन आधुनिक फीचर दिसतील. पण गाडीच्या टॉप रिचार्ज बाबत बोलायचं झालं तर यात पॅनोरॅमिक सनरूफ, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, फ्रंट पॅसेंजरसाठी पॉवर्ड बॉस मोड, 16-स्पीकर Harman Kardon साउंड सिस्टीम (Dolby Atmos), वायरलेस चार्जिंग आणि ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल असे काही फीचर्स आपल्याला दिसतात. थोडक्यात गाडीमध्ये सर्व प्रकारचे प्रीमियम फीचर्स देण्याचा प्रयत्न ब्रँडकडून झाला आहे. यामुळे ही गाडी नवयुवक तरुणांना लवकर आकर्षित करू शकते.
सेफ्टी फीचर्स कसे आहेत?
आता आपण वळूयात गाडीच्या सेफ्टी फीचर्सकडे. सेफ्टी फीचर्स बाबत बोलायचं झालं तर XUV 7XO मध्ये 540-डिग्री कॅमेरा, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक विथ ऑटो होल्ड, ISOFIX सीट अँकरेज आणि लेव्हल-2 ADAS (अॅडॅप्टिव क्रूझ कंट्रोल, लेन कीप असिस्ट, ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग) देण्यात आले आहे. या स्वदेशी ब्रॅंडने असा दावा केला आहे की ही SUV Bharat NCAP मध्ये 5-स्टार सुरक्षा मानांकन मिळवण्यास सक्षम राहिली आहे.
इंजिन आणि गिअरबॉक्स कसे आहे?
नवीन XUV 7XO मध्ये 2.0 लिटर टर्बो पेट्रोल (200hp) आणि 2.2 लिटर डिझेल (185hp पर्यंत) इंजिन पर्याय देण्यात आले आहेत. दोन्ही इंजिन्ससाठी 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स उपलब्ध असून, डिझेल व्हेरिएंटमध्ये AWD चा पर्यायही कायम ठेवण्यात आला आहे. महिंद्रा XUV 7XO मध्ये Alexa With ChatGPT उपलब्ध करून देण्यात आले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे असे फीचर्स उपलब्ध करून देणारी ही देशातील पहिलीच गाडी असल्याचा कंपनीचा दावा आहे.
गाडीची किंमत किती ?
गाडीच्या किमती बाबत बोलायचं झालं तर या गाडीची किंमत 15 लाख रुपयांपासून ते 25 लाख रुपयांपर्यंत राहणार आहे.












