Toyota Land Cruiser FJ : टोयोटा कंपनीची आगामी लँड क्रूझर एफजे ही मध्यम आकाराची एसयूव्ही आता 2026 च्या पहिल्या सहामाहीत अधिकृतपणे सादर होणार आहे. याआधी ही गाडी 2025 अखेरीस लाँच होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, आता या दमदार ‘स्मॉल फॉर्च्युनर’ची वेळ थोडी पुढे ढकलण्यात आली आहे. टोयोटाने ही एसयूव्ही जागतिक स्तरावर ‘Land Cruiser FJ’ या नावाने लाँच करण्याचे ठरवले असून ती अनेक बाजारपेठांमध्ये एक मजबूत ऑफ-रोडर पर्याय ठरेल.
वैशिष्ट्ये
ही एसयूव्ही पहिल्यांदा 2023 मध्ये एका टीझर इमेजद्वारे सादर करण्यात आली होती. यामध्ये ती लँड क्रूझर सीरिजमधील सर्वात लहान मॉडेल म्हणून ओळखली गेली होती. फॉर्च्युनरपेक्षा कमी आकाराची ही कार 4.5 मीटर लांब आणि 2,750 मिमी व्हीलबेससह येणार आहे. एकाच टीझर फोटोवरून अंदाज घेतल्यास, यामध्ये बॉक्सी डिझाईन, एलईडी लाइटिंग, उंच ग्राउंड क्लीअंस, जाड टायर्स, आणि टेलगेट-माउंटेड स्पेअर व्हील यांसारखी डिझाइन वैशिष्ट्ये पाहायला मिळू शकतात.

Land Cruiser FJ ही एसयूव्ही शिडी-फ्रेम चेसिसवर आधारित IMV 0 प्लॅटफॉर्म वापरेल, जो Toyota Hilux Champ सारख्या गाड्यांमध्ये वापरला जातो. यासाठी महागडा TNGA-F प्लॅटफॉर्म वापरला जाणार नाही. यामुळे उत्पादन खर्च कमी राहील आणि किंमत नियंत्रित राहण्याची शक्यता आहे.
इंजिनबाबत बोलायचं झालं तर, यामध्ये 2.7-लिटर 2TR-FE नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन दिलं जाऊ शकतं, जे 161 bhp आणि 246 Nm टॉर्क निर्माण करतं. हे इंजिन 6-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आणि 4-व्हील ड्राइव्ह सिस्टमसोबत येईल. काही निवडक बाजारात टोयोटा या गाडीचा हायब्रिड व्हेरिएंट देखील लाँच करू शकते.
भारतात लाँच होणार का?
सध्या Land Cruiser FJ भारतात येणार की नाही, याची अधिकृत घोषणा झाली नाही. पण भारतीय SUV बाजाराच्या झपाट्याने वाढणाऱ्या मागणीचा विचार करता, कंपनी भविष्यात ही गाडी भारतात आणण्याचा विचार करू शकते. ही गाडी Fortunerच्या खालच्या श्रेणीत बसवली जाईल, ज्यामुळे अधिक किफायतशीर पर्याय शोधणाऱ्यांसाठी ती एक उत्तम पर्याय ठरेल.
Land Cruiser FJ ही गाडी खास करून ऑफ-रोडिंग प्रेमींसाठी डिझाईन करण्यात आलेली असून, टोयोटा तिचं जागतिक बाजारात एक ब्रँडेड ऑफरिंग म्हणून सादरीकरण करणार आहे. भारतात तिच्या येण्याची शक्यता असली, तरी अद्याप प्रतीक्षा करावी लागेल.