टोयोटाची नवी इनोव्हा हायक्रॉस एक्सक्लुझिव्ह एडिशन लाँच! हे आहेत खास फिचर्स

टोयोटाने इनोव्हा हायक्रॉसची झेडएक्स (ओ) एक्सक्लुझिव्ह एडिशन खास स्टाईल, लक्झरी फीचर्स व मर्यादित रंगात लॉन्च केली आहे. ही कार मे ते जुलै २०२५ दरम्यान ग्राहकांसाठी सीमित संख्येत उपलब्ध असणार आहे.

Published on -

टोयोटा किर्लोस्कर मोटरने (टीकेएम) आपल्या ग्राहककेंद्रित दृष्टिकोनाला अनुसरून इनोव्हा हायक्रॉसच्या झेडएक्स (ओ) व्हेरियंटमध्ये एक्सक्लुझिव्ह एडिशन लॉन्च केली आहे. ही विशेष आवृत्ती मे २०२५ ते जुलै २०२५ या कालावधीत मर्यादित संख्येत उपलब्ध असेल. इनोव्हा हायक्रॉसने आपल्या आकर्षक डिझाईन, उत्कृष्ट कार्यक्षमता आणि प्रीमियम वैशिष्ट्यांमुळे देशभरातील लाखो ग्राहकांची मने जिंकली आहेत.

सुपर व्हाईट आणि पर्ल व्हाईट या दोन ड्युअल-टोन रंगांमध्ये सादर झालेली ही एडिशन स्टाईल, आराम आणि तंत्रज्ञानाचा अनोखा संगम घडवते. टोयोटाच्या या नव्या ऑफरिंगने प्रीमियम एमपीव्ही सेगमेंटमध्ये नवे मानदंड प्रस्थापित केले असून, ग्राहकांना प्रत्येक प्रवासात प्रीमियम अनुभव देण्याचे आश्वासन दिले आहे.

नवीन एडिशनमध्ये काय असणार आहेत फिचर्स

टोयोटा इनोव्हा हायक्रॉस एक्सक्लुझिव्ह एडिशन झेडएक्स (ओ) ३२.५८ लाख रुपये (एक्स-शोरूम) किंमतीत लॉन्च झाली आहे, जी स्टँडर्ड झेडएक्स (ओ) व्हेरियंटपेक्षा १.२४ लाख रुपये जास्त आहे. ही विशेष आवृत्ती ड्युअल-टोन एक्स्टिरिअरसह येते, ज्यामध्ये सुपर व्हाईट आणि पर्ल व्हाईट रंगांना काळ्या रंगाच्या छटांसह जोडण्यात आले आहे. यात ब्लॅक फ्रंट ग्रिल, ब्लॅक रूफ, ब्लॅक अलॉय व्हील्स, ब्लॅक ओआरव्हीएम, हूड एम्ब्लेम आणि रिअर गार्निश यांसारखे कॉस्मेटिक बदल आहेत.

याशिवाय, फ्रंट आणि रिअर अंडर-रन प्रोटेक्शन, व्हील आर्क मोल्डिंग आणि एक्सक्लुझिव्ह बॅजिंग यामुळे या एमपीव्हीला आणखी आकर्षक लूक मिळाला आहे. इंटिरिअरमध्येही ड्युअल-टोन थीम आहे, ज्यामध्ये डार्क चेस्टनट आणि ब्लॅक रंगांचा वापर इन्स्ट्रुमेंट पॅनल, डोअर फॅब्रिक, सीट मटेरियल आणि सेंटर कन्सोलवर करण्यात आला आहे.

यात पावर्ड ओट्टोमन सेकंड-रो सीट्स, फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्स, ड्युअल-झोन ऑटोमॅटिक एअर कंडिशनिंग, पॅनोरामिक सनरूफ, १०.१ इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, ९-स्पीकर जेबीएल साऊंड सिस्टीम आणि टोयोटा सेफ्टी सेन्स (एडीएएस) यांचा समावेश आहे. याशिवाय, एअर प्युरिफायर, लेग रूम लॅम्प आणि वायरलेस चार्जर सारखी अतिरिक्त वैशिष्ट्ये या एडिशनला वेगळेपण देतात.
सुरक्षेसाठी सहा एअरबॅग्ज

सुरक्षेसाठी सहा एअरबॅग्ज, ३६०-डिग्री कॅमेरा, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम आणि अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम (लॅन कीप असिस्ट, अॅडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, ब्लाइंड स्पॉट मॉनिटरिंग) यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत.

२३.२४ किमी मायलेज

ही गाडी टोयोटाच्या ५व्या पिढीच्या सेल्फ-चार्जिंग स्ट्रॉंग हायब्रिड सिस्टीमद्वारे चालते, ज्यामध्ये २.० लिटर, ४-सिलेंडर पेट्रोल इंजिन आणि इलेक्ट्रिक मोटरचा समावेश आहे. हे हायब्रिड पॉवरट्रेन १८६ पीएस पॉवर आणि २०६ एनएम टॉर्क जनरेट करते, आणि ई-सीव्हीटी ट्रान्समिशनशी जोडलेले आहे. ही सिस्टीम ६०% वेळ इलेक्ट्रिक (ईव्ही) मोडमध्ये चालू शकते, ज्यामुळे इंधन कार्यक्षमता वाढते.

एआरएआय-प्रमाणित मायलेज २३.२४ किमी/लिटर आहे, जे या सेगमेंटमधील सर्वोत्तम आहे. टोयोटाच्या टीएनजीए (टोयोटा न्यू ग्लोबल आर्किटेक्चर) प्लॅटफॉर्मवर आधारित, ही गाडी उत्कृष्ट राइड क्वालिटी आणि हँडलिंग ऑफर करते.

गाडीचे बुकींग सुरू

टोयोटा किर्लोस्कर मोटरचे उपाध्यक्ष (सेल्स-सर्व्हिस-यूज्ड कार बिझनेस) वरिंदर वाधवा यांनी सांगितले की, इनोव्हा हायक्रॉसने आपल्या एसयूव्ही-प्रेरित डिझाईन आणि एमपीव्हीच्या प्रशस्तपणाने ग्राहकांचा विश्वास जिंकला आहे. एक्सक्लुझिव्ह एडिशन ग्राहकांच्या बदलत्या अपेक्षांना पूर्ण करण्यासाठी डिझाइन केली आहे, जी स्टाईल, आराम आणि कार्यक्षमतेचा समतोल साधते. देशभरातील टोयोटा डीलरशिपवर या गाडीचे बुकिंग सुरू झाले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe