जानेवारी 2026 मध्ये हिरो मोटोकॉर्प पुन्हा नंबर 1; होंडा दुसऱ्या अन टीव्हीएस तिसऱ्या स्थानी, ओला इलेक्ट्रिकची स्थिती काय ?

Published on -

Two Wheeler : भारतीय ऑटो बाजारात दुचाकींची मागणी सातत्याने वाढत असून, विविध सेगमेंटमध्ये ग्राहकांना अनेक पर्याय उपलब्ध आहेत. या पार्श्वभूमीवर जानेवारी 2026 मधील विक्री आकडेवारी समोर आली असून, हिरो मोटोकॉर्पने पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले आहे.

भारतीय ग्राहकांमध्ये मजबूत विश्वास आणि विस्तृत डीलर नेटवर्कच्या जोरावर हिरोने 4,92,167 दुचाकींची विक्री नोंदवली. ही विक्री जानेवारी 2025 मधील 4,11,529 युनिट्सच्या तुलनेत तब्बल 19.59 टक्क्यांनी जास्त आहे.

विक्रीत दुसऱ्या क्रमांकावर होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया आहे. होंडाने या कालावधीत 4,72,938 दुचाकी विकल्या असून, वार्षिक आधारावर 26.29 टक्के वाढ नोंदवली आहे.

स्कूटर सेगमेंटमधील मजबूत उपस्थितीमुळे होंडाला मोठा फायदा झाला आहे. तिसऱ्या स्थानावर टीव्हीएस मोटर कंपनी असून, कंपनीने 3,64,241 युनिट्सची विक्री करत 26.15 टक्क्यांची वाढ साधली आहे.

चौथ्या क्रमांकावर बजाज ऑटो आहे. बजाजने 1,95,752 दुचाकींची विक्री करत 12.23 टक्के वाढ नोंदवली.

पाचव्या क्रमांकावर रॉयल एनफील्ड असून, कंपनीने 1,06,398 युनिट्स विक्रीसह 35.14 टक्के लक्षणीय वाढ दर्शवली आहे. मध्यम आणि प्रीमियम सेगमेंटमध्ये वाढत्या मागणीचा फायदा रॉयल एनफील्डला होत आहे.

सहाव्या स्थानावर सुझुकी आहे. सुझुकीने 98,899 दुचाकी विकल्या असून, 11.26 टक्के वाढ नोंदवली. सातव्या क्रमांकावर यामाहा असून, कंपनीने 64,399 युनिट्स विक्रीसह 10.35 टक्के वाढ साधली आहे.

इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये Ather Energyने प्रभावी कामगिरी केली आहे. कंपनीने 21,999 युनिट्स विक्री करत 67.97 टक्के वार्षिक वाढ नोंदवली आणि आठवे स्थान मिळवले.

मात्र, ओला इलेक्ट्रिकसाठी जानेवारी महिना आव्हानात्मक ठरला. कंपनीची विक्री 69.21 टक्क्यांनी घटून केवळ 7,516 युनिट्सवर आली असून, ती नवव्या स्थानावर घसरली आहे.

एकूणच, जानेवारी 2026 मध्ये पारंपरिक दुचाकी कंपन्यांनी मजबूत वाढ नोंदवली असताना इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये मिश्र चित्र दिसून आले आहे. आगामी महिन्यांत स्पर्धा आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News