महिंद्रा XUV700 कारच्या खरेदीवर तब्बल 48% कर लावल्याने एका ग्राहकाने सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त करत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना थेट प्रश्न विचारला आहे. या प्रकरणावरून कारच्या किमतीवरील जास्तीच्या कररचनेवर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे.
48% करामुळे मोठी वाढ!
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या XUV700 डिझेल वेरिएंटच्या बिलानुसार, या कारची मूळ किंमत 14,58,783 रुपये होती. मात्र, त्यावर 14% SGST, 14% CGST आणि 20% GST CESS असे एकूण सात लाखांहून अधिक कर आकारले गेले, त्यामुळे या कारची अंतिम किंमत 21.59 लाख रुपयांवर पोहोचली.
ग्राहकाने आपल्या पोस्टमध्ये अर्थमंत्र्यांना टॅग करत लिहिले की, “कार खरेदीवर 48% कर? तेही जेव्हा आधीच 31.2% आयकर भरावा लागतो. दिवसाढवळ्या लुटमारीला कोणतीही मर्यादा नाही का?”
जुन्या गाड्यांवरही करवाढ
नवीनच नव्हे, तर जुन्या गाड्यांच्या व्यवहारावरही कर वाढवण्यात आला आहे. GST कौन्सिलच्या 55व्या बैठकीत वापरलेल्या गाड्यांवरील GST 12% वरून 18% पर्यंत वाढवला आहे. मात्र, हा GST केवळ अधिकृत डीलरमार्फत खरेदी-विक्री करणाऱ्यांसाठी लागू आहे. जर तुम्ही थेट कोणत्याही खासगी व्यक्तीकडून जुनी कार खरेदी करत असाल, तर तुम्हाला 18% ऐवजी फक्त 12% कर भरावा लागेल.
परिणाम ग्राहकांवर
हे नवीन GST नियम ग्राहकांसाठी महत्त्वाचे ठरत आहेत. समजा, 18 लाख रुपयांची कार तुम्ही एखाद्या मित्राला किंवा नातेवाईकाला 13 लाखांना विकली, तर कोणताही GST लागू होणार नाही. मात्र, जर तीच कार एखाद्या डीलरकडून 17 लाखांना विकली गेली, तर केवळ 4 लाखांच्या नफ्यावर 18% GST लागू होईल. यामुळे जुन्या गाड्यांच्या व्यवहारावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
ग्राहकांची वाढती नाराजी
48% कराच्या मुद्द्यावर आता मोठी चर्चा रंगली आहे. महागाईच्या काळात एवढा मोठा कर ग्राहकांसाठी आर्थिकदृष्ट्या मोठा भार बनू शकतो. त्यामुळे सरकार या विषयावर काही स्पष्टीकरण देते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे