अहिल्यानगर : सध्या कांद्याचे भाव प्रचंड कोसळले आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांना कांद्यासाठी झालेला खर्च देखील वसूल होत1 नसल्याने त्यांची खूप आर्थिक स्तिथी बिकट झाली आहे . त्यामुळे कांदा या पिकाला हमीभाव मिळाला पाहिजे.
३५ ते ४० रूपये किलो भाव देऊन कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने पाठबळ दिले पाहिजे या प्रमुख मागणीसाठी आपली माती आपली माणसं या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष व शेतकऱ्यांचे युवा नेतृत्व रुपेश ढवण यांनी सोमवार दि.२८ पासून निघोज एस टी बस स्थानक परिसरात अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.

मंगळवार दि.२९ अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा दिवस होता.या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात पाठींबा मिळत असून, हे आंदोलन राज्यव्यापी असून जोपर्यंत सरकारचे कृषीमंत्री या ठिकाणी येऊन कांदा तसेच शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव देण्याचे आश्वासन देत नाहीत तोपर्यंत अन्नत्याग आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा रुपेश ढवण व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिला आहे.
सोमवार ,मंगळवार या दोन दिवसांत हजारो शेतकऱ्यांनी या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी येऊन ढवण व त्यांच्या सहकाऱ्यांची भेट घेतली आहे. तसेच हे आंदोलन आणखीन तिव्र करण्यासाठी बुधवार दि.३० रोजी रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थ व शेतकरी यांनी दिला आहे. तसेच बुधवार दि.३० रोजी सकाळी नऊ वाजता निघोज व परिसरातील दिंडी मंडळांनी प्रदक्षिणा काढुन आंदोलनाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
दोन दिवसांपूर्वी ढवण यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन आंदोलन संदर्भात त्यांच्याशी चर्चा केली होती याबाबत हजारे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर या आंदोलना बाबत चर्चा करणार असून लवकरच शेतकऱ्यांचे नेते बच्चू कडू निघोज येथील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भेट देणार असल्याचे ढवण यांनी सांगितले.
दोन दिवसांत पोलिस निरीक्षक वगळता कुणीही या ठिकाणी आले नाही याचा शेतकऱ्यांनी निषेध केला असून बुधवार पासून आंदोलन तिव्र करण्यासाठी आक्रमक भूमिका घेऊन सरकारला धडा शिकविण्याचा निर्णय शेतकरी व ग्रामस्थ यांनी व्यक्त केला आहे.