Onion Market : कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे ठरले, आजपासून लिलाव बंद !

Published on -

Onion Market :  टोमॅटोनंतर कांद्याचीही होत असलेली दरवाढ लक्षात घेऊन केंद्र सरकारने कांद्यावर ४० टक्के निर्यातशुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

या निषेधार्थ नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशनने जिल्ह्यातील कांदा लिलावात सोमवारी सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बाजार समितीचे लिलावदेखील अघोषित बंद राहणार आहेत.

नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापारी व निर्यातदार यांच्या लासलगाव येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शेतकरी संघटनांच्या विनंतीनुसार व्यापाऱ्यांनी बंदचा निर्णय घेतला आहे. गेले कित्येक दिवस कवडीमोल भावाने कांद्याची विक्री सुरू होती. अनेक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सोसावे लागले होते.

आता गेल्या १५ दिवसांपासून कुठेतरी कांद्याला थोडाफार भाव मिळत असताना केंद्र सरकारने कांदा निर्यातशुल्क ४० टक्के वाढवल्याने त्याचा थेट परिणाम कांद्याच्या बाजारभावावर होणार

असल्याने शेतकरी हितासाठी बाजार समितीच्या सर्व घटकांनी राज्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये सोमवारी लाक्षणिक बंद पाळावा, असे आवाहन मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर यांनी केले आहे.

निर्यात मंदावणार; दर कोसळणार

उन्हाळ कांदा सुरुवातीला बाजारात आल्यानंतर केवळ ३०० ते ४०० रुपये प्रतिक्विंटल दराने तो विक्री करावा लागला होता. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च निघणे अवघड झालेले होते. अशा परिस्थितीत चाळीत साठवलेला कांदा सध्या बाजारपेठेत विक्रीला आणला जात आहे.

याच कांद्याला १५०० ते १६०० रुपये भाव सध्या शेतकऱ्यांना मिळत असताना केंद्र सरकारने अत्यंत चुकीचा निर्णय घेऊन निर्यातशुल्क ४० टक्क्यांपर्यंत वाढवल्याने आपोआपच निर्यातीला त्याचा फटका बसणार असून, त्याचा थेट परिणाम बाजारभावावर होणार आहे.

कांद्याची परिस्थिती टोमॅटोसारखी होऊ नये म्हणून निर्णय

राज्यांतर्गत मागणीसाठी कांदा कमी प्रमाणात पुरतोय, म्हणून कदाचित केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. भविष्यात जर कांद्याची परिस्थिती टोमॅटोसारखी झाली, तर त्यासाठी आपल्याकडे स्टॉक असला पाहिजे, म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी स्पष्ट केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe