Onion News : संगमनेरात कांद्याचे भाव चांगले वाढले आहे. शहरातील भाजी बाजारामध्ये कांदा पन्नास ते साठ रुपये किलोने विक्री केला जात आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काल मंगळवारी कांद्याला प्रति किंटलला तब्बल ४ हजार ८११ रुपयांचा भाव मिळाला.
शहरातील भाजीपाला बाजारामध्ये गेल्या दहा दिवसांपासून कांद्याचा भाव वाढला आहे. कांद्याची विक्री तब्बल पन्नास ते साठ रुपये दराने केली जात आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक काही प्रमाणावर घटली आहे. त्यामुळे कांद्याला चांगला भाव मिळत आहे.
संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काल मंगळवारी लाल कांद्याला ४८११ रुपयांपर्यंत भाव मिळाला. लाल कांदा नंबर एकला ४१०० ते ४८११, नंबर दोनला तीन हजार ते ३९००, तर नंबर तीनला अडीच हजार ते २९००, नंबर चारला पाचशे ते दोन हजार, असा प्रत्येक क्विंटल भाव मिळाला.
उन्हाळ कांद्यालाही चांगला भाव मिळाला. उन्हाळ कांदा नंबर एकला साडेतीन हजार ते ४०११, नंबर दोनला अडीच हजार ते ३४००, नंबर तीन २००० ते ३४०० असा भाव मिळाला. कांद्याचे भाव अचानक वाढल्याने हॉटेल व इतर ठिकाणी कांद्याच्या वापरावर मर्यादा आल्या आहेत.