२९ जानेवारी २०२५ अहिल्यानगर : हवामान बदलामुळे कोकणातील हापूस हंगामाला उशिराने सुरुवात होणार असली तरी वाशीच्या एपीएमसी बाजारात सोमवारी कोकणातील हापूस आंब्याच्या २४ पेट्या दाखल झाल्या.त्यामुळे हापूसची आवक होण्यास सुरुवात झाल्याने या आंब्यांची विधिवत पूजा करून विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले.हापूस विक्रीच्या पहिल्या दिवशी ४ ते ६ डझन पेटीला १० ते १५ हजार रुपये भाव मिळाला. यंदा हापूसचे उत्पादन चांगले असेल, मात्र हवामान बदलामुळे हंगामाला उशिराने सुरुवात होणार आहे. १५ मार्चनंतर मोठ्या प्रमाणात हापूसची आवक वाढेल, असे मत येथील व्यापाऱ्यांनी व्यक्त केले.
दरवर्षी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात हापूस दाखल होण्यास सुरुवात होते. मात्र, यंदा हवामान बदलाने हापूसच्या उत्पादनाला फटका बसला आहे. फळधारणा सुरू असलेल्या आंब्याचे नुकसान झाले होते. हापूसला मोहर येण्याच्या वेळी हवामान बदल, परतीचा पाऊस तसेच कडाक्याची थंडी यामुळे अतिमोहोर आला.त्यामुळे बहुतांश ठिकाणी फळधारणा झाली नाही. तर थ्रिप्स रोगामुळेदेखील मोहर गळून पडला. परिणामी हापूसच्या सुरुवातीच्या उत्पादनाला फटका बसला. आता पुन्हा नव्याने मोहर येत असून हवामानावर उत्पादन अवलंबून आहे, अशी माहिती हापूस शेतकऱ्यांनी दिली. त्यामुळे यंदा हापूसची चांगली आवक होईल, मात्र त्याला थोडा विलंब होणार आहे.
मार्च महिन्यात आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढेल. त्यामुळे हापूस आंब्याची चव चाखण्यासाठी सर्वसामान्य खवय्यांना मार्चपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. सोमवारी कोकणातील हापूसच्या २४ पेट्या वाशीच्या एपीएमसी बाजारात दाखल झाल्या. या हापूसची ४ ते ६ डझनाची एक पेटी १० ते १५ हजार रुपये बाजारभावाने विकली गेली.
वाशीतील फळबाजारात सोमवारी हापूसच्या २४ पेट्या दाखल झाल्या. हवामान बदल आणि पावसामुळे यंदाच्या सुरुवातीच्या उत्पादनाला फटका बसला. त्यामुळे यंदा हंगामाला एक महिना उशिराने सुरुवात होत आहे. सध्या बाजारात तुरळक प्रमाणात हापूसची आवक राहणार असल्याने हापूसचे दर चढेच राहतील. मात्र, मार्चमध्ये आवक वाढताच दर आवाक्यात येतील.अशी माहिती बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.