Tomato Price : महिनाभरापासून टोमॅटोचे भाव तेजीत आहेत. सरकारी पातळीवर टोमॅटोचे भाव नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र, तरीही प्रत्यक्षात टोमॅटोचे भाव कमी होत नसून, दिवसागणिक वाढत आहेत. किरकोळ बाजारात टोमॅटोने प्रति किलो तब्बल २०० रुपयांचा आकडा गाठला आहे. ४० ते ५० रुपये पावकिलो भावाने टोमॅटोची विक्री होत आहे. या परिस्थितीत सर्वसामान्य ग्राहकांनी मात्र टोमॅटो खरेदीकडे पाठ फिरविली आहे.
घरगुती ग्राहकांकडून टोमॅटो अल्प प्रमाणात खरेदी करण्यात येत आहेत. हॉटेल व्यावसायिकांना ग्रेव्ही, पावभाजी, सांबरसह विविध खाद्यपदार्थ बनविण्यासाठी टोमॅटो लागतोच. त्यामुळे त्यांच्याकडून टोमॅटोची खरेदी करण्यात येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोचे दर गगनाला भिडल्याने हॉटेल व्यावसायिकांनीदेखील निम्म्याने खरेदी कमी केली आहे. घरगुती ग्राहकांकडून तर नगण्य मागणी होत आहे. त्यातच सतत पाऊस सुरू असल्यामुळे टोमॅटोचा दर्जाही खालावला आहे.
सद्यःस्थितीत किरकोळ बाजारात दररोज साडेचार ते पाच हजार पेटींची आवक होत आहे. मागणीच्या तुलनेत आवक खूपच कमी असल्याने घाऊक बाजारात दर्जानुसार प्रति किलोला ६० ते १०० रुपये भाव मिळत आहे. किरकोळ बाजारात १५० ते २०० रुपयांपर्यंत विक्री केली जात आहे.
घाऊक बाजारात चांगला दर्जा असणाऱ्या टोमॅटोच्या प्रति किलोला १०० ते १२० रुपये भाव मिळत आहे. पावसामुळे ७५ टक्के माल हलक्या दर्जाचा येत आहे. अवघा २५ टक्के मालच चांगला आहे. आणखी नवीन मालाची आवक बाजारात येईपर्यंत म्हणजे जवळपास महिनाभर तरी भाव चढेच राहतील, असा अंदाज आहे.
दोन महिन्यांपूर्वी टोमॅटोची आवक जास्त होत होती. त्यामुळे टोमॅटोला कवडीमोल भाव मिळत होता. त्यावेळी लागवड खर्च, वाहतूक खर्चही भरून न मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. अनेकांनी टोमॅटो फेकून दिले. तर, कित्येकांनी झाडे काढून टाकली. त्यानंतर टोमॅटोची आवक आता घटली आहे. त्या तुलनेत मागणी जास्त असल्याने भाव कडाडले आहेत.
सोमवारी (दि. २४) पुण्यातील बाजारात सुमारे चार ते पाच हजार पेटींची आवक झाली. घाऊक बाजारात किलोला दर्जानुसार ६० ते १०० रुपये भाव मिळत आहे. येथील बाजारात पुणे विभागातून टोमॅटोची आवक होते. दरम्यान, टोमॅटोची नवीन लागवड झाली आहे. मात्र, माल तयार होऊन बाजारात येण्यास एक ते दीड महिन्याचा कालावधी लागणार आहे. तोपर्यंत टोमॅटोचे भाव चढेच राहतील,