अहिल्यानगर : संततधार पावसामुळे टोमॅटो पिकाचे नुकसान होत असल्याने जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये आवक घटल्याचा परिणाम किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर वाढण्यात झाला आहे. आठवड्यापूर्वी ३० ते ४० रुपये किलो असलेले टोमॅटो आता ६० रुपयांपर्यंत पोहचले आहेत.
त्यातही उत्तम दर्जाच्या टोमॅटोला प्रतिकिलो ६० ते ८० रुपये असा दर मिळत आहे. पावसामुळे नवीन टोमॅटो लागवडही मंदावल्याने दर अधिक वाढण्याची शक्यता आहे.

मेपासून काही दिवसांचा अपवाद वगळता आतापर्यंत जिल्ह्याच्या अनेक भागात सतत पाऊस सुरू आहे. प्रारंभी अवकाळी आणि नंतर मान्सूनमुळे उभ्या पिकांना मोठा फटका बसला. विशेषत्वाने सततच्या पावसापुढे निभाव न लागणाऱ्या पिकांचे अधिक नुकसान झाले.
सध्या अनेक भागात शेतामध्ये पाणी आणि चिखल असल्याने टोमॅटो काढणीवरही परिणाम झाला आहे. त्यामुळे बाजारात टॉमेटोची आवक कमी होत आहे. त्यामळे दरवाढ झाली आहे. अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी विविध भाजीपाल्याची २०१५ क्विंटल आवक झाली होती. यामध्ये सर्वाधिक ३८४ क्विंटल टोमॅटोची आवक झाली होती.
यावेळी टोमॅटोला ८०० ते ४००० रुपयांपर्यंत भाव मिळाला. मागील आठ दिवसांपासून टोमॅटोच्या भावात वाढ होत असल्याचे दिसून आले. बटाट्याची ३७१ क्विंटलवर आवक झाली होती. बटाट्याला प्रतिक्विंटल ९०० ते २००० रुपयांपर्यंत भाव मिळाला. वांग्याची ९८ क्विंटल आवक झाली होती. यावेळी वांग्यांना ८०० ते ३००० रुपये भाव मिळला.
सोमवारी हिरव्या मिरचीची ११९ क्विंटलवर आवक झाली होती. हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटल ३००० ते ७००० रुपयांपर्यंत भाव मिळाला. लसणाची २८ क्विंटल आवक झाली होती. लसणाला प्रतिक्विंटल ४००० ते १० हजार रुपयांपर्यंत भाव मिळला. शेवग्याची ९६ क्विंटलवर आवक झाली होती. शेवग्याला प्रतिक्विंटल १००० ते ३००० रुपयांपर्यंत भाव मिळाला.
लिंबांची २१ क्विंटल आवक झाली. लिंबाला प्रतिक्विंटल १००० ते १८७० रुपयांपर्यंत भाव मिळाला. सध्या श्रावण महिन्यामुळे मोठ्या प्रमाणात उपवास असल्याने अनेक उपवासाच्या पदार्थात हिरवी मिरचीचा वापर अधिक प्रमाणात करतात. त्यामुळे हिरवी मिरची ,बटाटा यांचे दर टिकून आहेत.