Soybean Market : अपेक्षित दराच्या प्रतिक्षेत सोयाबीन घरातच ! सोयाबीनचा पेरा कमी होणार

Ahmednagarlive24 office
Published:
Soybean Market

Soybean Market : सध्या सोयापेंडला चांगला दर मिळत नसल्यामुळे सोयाबीनचे भाव पडून आहे. एकीकडे सोयाबीन तेलाला मागणी आहे. मात्र दुसरीकडे सोयापेंडला उठाव नाही. त्यामुळे सोयाबीनचा भाव दिवसेंदिवस घटत आहे.

भाव वाढीच्या अपेक्षेने शेतकरी साठवणूकीवर भर देतात. मागील दोन ते तीन वर्षापासून अनेक शेतकऱ्यांनी साठवलेला सोयाबीन दरवाढीच्या प्रतीक्षेत अद्याप घरात पडून असल्याची माहिती येथील भुसार मालाचे व्यापारी संजय गाडेकर यांनी दिली.

मागील पाच ते सहा महिने झाले, तरी सोयाबीन भाववाढीची चिन्हे दिसत नाहीत. उलट दिवसेंदिवस भाव गडगडत आहेत. तर दुसरीकडे शेती उपयोगी साहित्याचे दर गगनाला भिडत आहेत.

शेतीसाठी येणारा खर्च झपाट्याने वाढत आहे आणि उत्पन्न कमी होत आहे. त्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. सध्या बाजारात सोयाबीनचा भाव पाच हजार रुपयांपेक्षा कमी आहेत. त्यामुळे साठवणूक केलेल्या सोयाबीनचे काय करावे, असा प्रश्न शेतकरी वर्गाला पडला आहेत.

यंदा दुष्काळी परिस्थितीचा सामना करत शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकवले. पेरणीपासूनच पाणीटंचाईचे संकट असल्याने अनेक शेतकऱ्यांनी दुबार पेरणी करून अतिशय कष्टाने पीक जगविले होते.

निसर्गाच्या लहरीपणाने प्रतिकूल परिस्थितीत शेती करताना शेतकऱ्यांना भरमसाठ खर्च करून उत्पन्न मात्र अल्प मिळाले. त्यातच काढणीनंतरच भावात घसरण झाल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन विकण्यापेक्षा घरात साठविण्याचे ठरविले होते.

आगामी काळात भाववाढ होईल आणि समाधानकारक दर मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांची होती. मात्र दिवसेंदिवस सोयाबीनचे दर घटत असल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फाटका बसला आहे.

पेरा घटण्याचा अंदाज

तालुक्यातील शेतकरी खरीप हंगामात मका आणि सोयाबीन पिकांची पेरणी करतात. मात्र, यंदा सोयाबीन लागवडीतून शेतकऱ्यांच्या पदरात पडलेली निराशा बघता, येत्या खरीप हंगामात २० ते २५ टक्के सोयाबीनचा पेरा कमी होणार आहे.

तर मका पिकास वर्षभर बाजारभाव टिकून असल्याने आता बहुसंख्य शेतकरी मका पिकाकडे वळतील. – अविनाश चंदन, तालुका कृषी अधिकारी, श्रीरामपूर

कर्जाचा डोंगर वाढला

गेल्या वर्षी दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे सोयाबीन उत्पादनात मोठी घट झाली. त्यात बाजारभाव स्थिर नसल्याने सोयाबीन साठवणूक केली. पैशाअभावी बँकेचे, पतसंस्थांकडून कर्ज घेऊन रब्बी हंगामाची पिके उभी केली.

अजूनही सोयाबीनची भाववाढ न झाल्याने चार पैसे मिळण्याची आशा आता मावळून कर्जाचा डोंगरच वाढत आहे. – निलेश शेडगे, युवा शेतकरी, श्रीरामपूर

दीड वर्षांपासून निचांकी दर
जानेवारी २०२३ : ५ हजार ०५० रुपये
फेब्रुवारी : ४ हजार ८८० रुपये
मार्च : ४ हजार ९६० रुपये
जानेवारी २०२४ : ४
हजार ५१० रुपये
फेब्रुवारी : ४ हजार ४३० रुपये
मार्च ४ हजार ३२० रुपये

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe