Onion Rates : कांद्याचे बाजार मागील अनेक महिन्यांपासून घसरलेले आहेत. ८ डिसेंबरपासून निर्यातबंदी लागू केल्याने हे भाव गडगडले. किरकोळ बाजारात कांद्याचे दर ८० ते १०० रुपये प्रतिकिलोपर्यंत गेले असल्याने दर नियंत्रित करण्यासाठी निर्यातबंदीचा निर्णय घेतला गेला होता.
त्यानंतर शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी रोष व्यक्त करत आंदोलने करत निर्यातबंद उठवण्याची मागणी केली. परंतु अद्याप निर्यातबंदी उठवली नसून नजीकच्या काळात ही निर्यातबंदी उठेल याचीही शक्यता धूसर झाली आहे.

लागवड 30 टक्क्यांनी घटल्याने शक्यता धूसर
केंद्रीय पथक त्यानंतर सातत्याने देशातील कांद्याची स्थिती आणि दरांचा आढावा घेत आहे. त्यात लागवड ३० टक्क्यांनी कमी असल्याचे निदर्शनास आल्यानंतर निर्यातबंदी हटविणे शक्य नसल्याची माहिती केंद्रीय अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र राज्य निर्यातदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत स्पष्ट केली. दरम्यान पुढील महिन्यात १५ मार्च रोजी स्थितीचा आढावा घेण्यासाठी पुन्हा बैठक आयोजित करण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
- महसूल मंत्री विखे पाटील व खा. सुजय विखे प्रयत्नशील
कांद्यावरील निर्यातबंदी हा विषय आगामी निवडणुकात अडचणीचा ठरू शकतो, आणि ही गोष्ट विखे परिवाराने हेरल्यामुळे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व खा. सुजय विखे यांनी गुरुवारी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.
कांद्यावरील निर्यात बंदी हटवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, असे साकडे त्यांनी घातले. त्यावर लवकरात लवकर निर्णय घेण्याची ग्वाही शाह यांनी दिल्याचे विखे म्हणाले. त्या आधी देखील खा. सुजय विखे यांनी अमित शहा यांची भेट घेत यावर चर्चा केली होती.