दिवाळीचे कपडे खरेदी करण्यापूर्वी ही बातमी अवश्य वाचा..! नगरमधील ‘त्या’दुकानावर पोलिसांची कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑक्टोबर 2021 :- शहरातील कापड बाजारातील एका मोठ्या कापड दुकानात रेमंडचा ब्रॅड लावून हलक्या प्रतीच्या कापडाची विक्री करण्यात येत होती.

कोतवाली पोलिसांनी या कापड दुकानावर कारवाई केली असून दुकान मालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेमंड लिमिटेडचे संचालक मनोज गणपत पई यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

कापड बाजारात एका मोठ्या कपड्याच्या दुकानात रेमंड ब्रॅण्डचा स्टिकर लावून हलक्या प्रतीच्या कापडाची विक्री करण्यात येत होती. नियमित तपासणीदरम्यान दुकानदाराची ही बनावटगिरी रेमंड कंपनीचे संचालक पई यांच्या निर्दशनास आली.

त्यानंतर त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी सोमवारी सायंकाळी छापा टाकून त्या दुकानदाराला ताब्यात घेतले. हा दुकानदार अनेक वर्षापासून कापडबाजारात कापड विक्रीचा व्यवसाय करत आहे.

हलक्या प्रतीच्या कापडावर रेमंड कंपनीचे स्टिकर लावून उच्च दरात त्याची विक्री करण्यात येत असे. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून बनावट ब्रॅण्डचे कापड जप्त करण्यात आले आहे.

ऐन दिवाळीत कापड दुकानदाराची अशी बनावटगिरी समोर आल्याने ग्राहकांना कपडे खरेदी करताना सावधगिरी बाळगावी लागणार आहे.