अहमदनगर ब्रेकिंग : डोळ्यात मिरची पुड टाकून १० लाख लूटले

Published on -

Ahmadnagar breaking : बँकेतून काढलेली १० लाख रुपयांची रक्कम दुचाकीवरुन घेवून निघालेल्या इसमाच्या डोळयात मिरची पावडर टाकून व तलवारीचा धाक दाखवून अज्ञात चोरट्यांनी लूटले. ही घटना गुरुवारी (दि.२८) रोजी दुपारच्या सुमारास शेवगाव शहरातील खुंटेफळ रस्त्यावरील जलशुध्दीकरण केंद्रासमोर घडली.

यामध्ये विठ्ठल लक्ष्मण सोनवणे (वय-४६, रा.शेवगाव) यांच्या पायाला मार लागून जखमी झाले आहेत. दुचाकीवरुन चोरटे पसार झाले असून याबाबत रात्री उशीरापर्यंत पोलिस ठाण्यात कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नव्हता.

याबाबत अधिक माहिती अशी की, खुंटेफळ रस्त्यावरील तिरुपती काँटन इंडस्ट्रीजमधील मॅनेजर विठ्ठल सोनवणे यांनी शहरातील पाथर्डी रस्त्यावरील बडोदा बँकेमधून गुरुवारी दुपारी दीड वाजता जिनींगसाठी लागणारी १० लाख रुपयांची रक्कम काढली.

ती रक्कम घेवून ते खुंटेफळ रस्त्याने जिनींगकडे दुचाकीवरुन निघाले होते. ते जलशुध्दीकरण केंद्राजवळ आल्यानंतर दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी सोनवणे यांच्या डोळयात मिरचीची भुकटी टाकून दुचाकी ढकलून दिली.

त्यानंतर त्यांना तलवारीचा धाक दाखवून त्यांच्याकडील बँग घेवून ते पसार झाले. या घटनेत सोनवणे यांच्या पायाला दुखापत झाली. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर परिसरातील ग्रामस्थ त्यांच्या मदतीला धावून आले.

मात्र चोरटे रक्कम घेवून शेवगावकडे पसार झाले होते. लुटीची माहिती पोलिसांना दिल्यानंतर त्यांनी बँकेतील व परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली.

खुंटेफळ रस्त्यावरील एका फुटेजमध्ये काळ्या रंगाच्या विनाक्रमांकाच्या दुचाकीवरुन दोघेजण बॅग घेवून जात असल्याचे निदर्शनास आले. रात्री उशीरापर्यंत पोलीस ठाण्यात कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नव्हता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe