Ahmednagar Breaking : श्रीगोंदा तालुक्यातील घोडेगाव येथील ६७ वर्षीय मारुती पाराजी मचे यांच्या मृत्यूप्रकरणी पाच जणांविरोधात अमोल मचे यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी नुसार तालुक्यातील घोडेगाव येथे मारुती पाराजी मचे (वय ६७) यांची शेती असून, त्यांच्या शेती शेजारी शिवाजी सखाराम मचे, लक्ष्मी देविदास मचे यांची शेती असून, त्यांच्यात शेतीच्या बांधावरून आणि पाण्यावरून नेहमी वाद होत असे.
दि. १३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी मयत मारुती पाराजी मचे हे घोडेगाव शिवारातील शेतात गेले असता, शिवाजी सखाराम मचे, लक्ष्मी देविदास मचे, अक्षय देवीदास मचे, स्वप्नील देविदास मचे, वेदांत शिवाजी मचे, या पाच जणांनी बंधाऱ्यावर पाण्याची मोटार का टाकली, यावरून शिवीगाळ करत त्यांना दगडाने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
या मारहाणीत मारुती मचे हे बेशुध्द पडल्याने त्यांना श्रीगोंदा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच ते मयत झाले. याबाबत श्रीगोंदा पोलिसांना खबर देत नातेवाईकांनी मृतदेहाची उत्तरीय तपासणी पुणे येथील ससून रुग्णालयात करावी तसेच खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.
त्यानुसार उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह ससून रुग्णालयात नेण्यात आला. ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी मयताच्या अंगाला मुकामार असल्याच्या प्राथमिक अहवाल दिल्यानंतर शिवाजी सखाराम मचे, लक्ष्मी देविदास मचे, अक्षय देवीदास मचे, स्वप्नील ” देविदास मचे, वेदांत शिवाजी मचे, या पाच जणांविरोधात अमोल मचे यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.