Ahmednagar Breaking : शिक्षक हा शिक्षण व्यवस्थेतला महत्वपूर्ण घटक. शिक्षक व विद्यार्थी यांचे नाते निराळेच. गुरूंसह स्थान अत्यन्त उच्च समजले जाते.
शिक्षक जर पोटतिडिकेचा असेल तर गावकऱ्यांसोबतच तो विद्यार्थ्यांचाही गळ्यातील ताईद बनून जातो. असे अनेक शिक्षक आहेत की ज्यांच्या केवळ बदलीने देखील विद्यार्थी काकुळतीला येतात.
गाव बंद ठेवले जाते. अशाच एका आदर्श शिक्षक, विद्यार्थ्यांच्या लाडक्या शिक्षकावर वाढदिवसाच्या दिवशीच काळाने घाला घातला. सुरेश पांडुरंग पालवे (वय ४२) असे या आदर्श शिक्षकाचे नाव असून ते पाथर्डी तालुक्यातील देवराई येथील रहिवासी होते.
ते आजारी होते. महिन्यापासून त्यांची मृत्यूशी झुंज सुरु होती. त्यांनी अहमदनगर, मुंबई, पुणे या ठिकाणी उपचार घेतले. परंतु त्यांच्यावर उपचार लागू झाले नाहीत व त्यांचा अंत झाला.
गडचिरोली जिल्ह्यात एटापल्ली नावाचा तालुका असून येथील नैनगुडा जिल्हा परिषद शाळेमध्ये सुरेश पालवे हे शिक्षक होते.
एक आदर्श शिक्षक, उपक्रमशील शिक्षक अशी त्यांची गडचिरोली जिल्ह्यात प्रसिद्धी पसरली होती. शाळेसाठी झोकून देत त्यांनी अनेक उपक्रम त्याठिकाणी राबवले. त्यामुळे ते पालकांसह मुलांचेही खूप आवडते झाले.
परंतु विद्यार्थ्यांच्या गळ्यातील ताईत असलेले शिक्षक सुरेश पांडुरंग पालवे यांचे आकस्मिक निधन झाले व सर्वत्रच हळहळ व्यक्त होऊ लागली.
आज १५ फेब्रुवारीला सुरेश पालवे यांचा ४३ व्य वाढदिवसालाच त्यांच्यावर काळाने घाला घातल्याने ही घटना अनेकांच्या मनाला चटका लावून गेली आहे. सुरेश पालवे यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार असून त्यांच्या जाण्याने या परिवारासह शिक्षण क्षेत्रातही शोककळा पसरली आहे.