Ahilyanagar Breaking : नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी गावाच्या आढाव वस्तीमध्ये महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात कार्यरत कर्मचाऱ्याच्या पत्नीचा भरदिवसा अज्ञात व्यक्तीने डोक्यात वार करून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी उघड झाली. लताबाई नानाभाऊ कराळे (वय ५०, रा. भोपते तलावाजवळ, आढाव वस्ती, पिंपळगाव माळवी, ता. नगर) असे मयत महिलेचे नाव आहे.
या प्रकरणी नानाभाऊ कराळे (वय ५९) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. ते १९८५ पासून महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात वॉटर सप्लायर म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा मुलगा जालिंदरदेखील गेल्या पाच महिन्यांपासून महापालिकेत कंत्राटी कामगार म्हणून काम करत आहे. दररोज सकाळी ९ वाजता पिता-पुत्र नगरमध्ये कामावर जात आणि सायंकाळी ६ वाजेपर्यंत गावी परतत. त्यांच्या पत्नी लताबाई दिवसभर घरी राहून शेतीची कामे आणि पाळीव जनावरांची देखभाल करत असत.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/Ahilyanagar-Crime-News-murder-women-.jpg)
घटनादिवशी, १३ फेब्रुवारीला सकाळी नेहमीप्रमाणे नानाभाऊ व त्यांचा मुलगा कामावर गेले. सायंकाळी घरी परतल्यावर त्यांना लताबाई घरात दिसल्या नाहीत. गोठ्यातील जनावरांनाही चारा-पाणी दिले नव्हते. त्यामुळे त्यांनी त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला. घराचा दरवाजा उघडल्यावर लताबाई यांचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह पडलेला आढळला. त्यांच्या शेजारी एक वाकलेला चाकू देखील होता.
या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक माणिक चौधरी पोलीस पथकासह घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर पोलीस अधीक्षक राकेश ओला आणि पोलीस उपअधीक्षक संपतराव भोसले यांनीही घटनास्थळी पाहणी केली. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. रात्री उशिरा नानाभाऊ कराळे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांकडून तपास सुरू
प्राथमिक तपासातून असे आढळून आले आहे की, लताबाई कराळे यांचा डोक्यात कोणत्यातरी वस्तूने वार करून किंवा डोके जमिनीवर आपटल्यामुळे मृत्यू झाला असावा. भरदुपारी झालेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, त्या घरी एकट्याच असल्याने लुटीच्या उद्देशाने हत्या झाल्याची शक्यता आहे. मात्र, नेमके कारण अद्याप स्पष्ट नाही. पोलिसांकडून या हत्येचा उद्देश शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.