३ मार्च २०२५ पाथर्डी : तालुक्यातील मिरी येथील चैतन्य कानिफनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सध्या वेगाने सुरू आहे. या ठिकाणी मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याचे काम सुरू आहे. मंदिरासमोर सभामंडप उभारण्याच्या हेतूने रविवारी सकाळी देवस्थान कमिटीच्या वतीने खोदकाम सुरू करण्यात आले. खोदकाम करताना गणपतीची आकर्षक अशी पुरातन काळातील दगडात कोरीव असलेली मूर्ती ग्रामस्थांच्या नजरेस पडली.
त्यानंतर बांधकाम थांबवण्यात आले. गणपतीची मूर्ती ग्रामस्थांनी सुरक्षितपणे बाहेर काढली. गणपतीची मूर्ती खोदकाम करताना सापडल्याची माहिती वाऱ्यासारखी मिरीसह परिसरात पोहोचली. काही वेळातच त्या ठिकाणी शेकडो लोक उपस्थित झाले. मिरी येथे सापडलेली गणपतीची मूर्ती दगडात कोरीव घडवलेली असून,

ही मूर्ती पाहण्यासाठी सकाळपासूनच ग्रामस्थ, भाविक मंदिर परिसराकडे गर्दी करीत होते. चैतन्य कानिफनाथ मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी ज्यावेळी खोदकाम सुरू करण्यात आले, त्यावेळीही त्या ठिकाणी विष्णूची मूर्ती सापडल्याची ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे. आता या पुरातन वास्तूमध्ये गणपतीच्या मूर्तीचीही भर पडली आहे.
पुरातत्व विभागाला माहिती देणार
कानिफनाथ मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे काम सुरू असून, देवस्थान समितीच्या वतीने मंदिरासमोर सभामंडप उभारण्याच्या दृष्टीने रविवारी खोदकाम सुरू करण्यात आले. त्या वेळी त्या ठिकाणी गणपतीची मूर्ती आढळून आली. या मूर्तीसंदर्भात पुरातत्त्व विभागाकडे संपर्क साधून, त्यांना या सापडलेल्या मूर्तीची कल्पना दिली जाणार आहे. – संतोष शिंदे, विश्वस्त, कानिफनाथ देवस्थान, मिरी