Ahilyanagar Breaking News: अवघ्या दोन वर्षांपूर्वी प्रेम विवाह झालेल्या सुनेचा गोठ्यामध्ये जाळून पती, सासू, सासरा यांनी खून केल्याची घटना मंगळवारी दुपारी तीन ते सहा या वेळेत पाथर्डी तालुक्यात घडली आहे. कीर्ती अनिकेत धनवे (वय.२२वर्षे) असे या घटनेत खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे.
याबाबत माहिती मिळताच पोलीस उपाधीक्षक सुनील पाटील पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी तांबे व हरीश भोये यांनी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घटनास्थळी कीर्ती धनवे हिचा मृतदेह आगीमध्ये जळून खाक झाला होता.
त्यामुळे पोलिसांनी फॉरेन्सिक लॅब पथकाला बोलावले होते. याबाबत सविस्तर माहिती अशी, मुंबईच्या उल्हासनगर येथील कीर्ती हिचा विवाह पाथर्डी तालुक्यातील वडगाव येथील अनिकेत अंकुश धनवे याच्याशी २०२३ मध्ये झाला होता. अनिकेत व कीर्ती यांचा हा प्रेम विवाह होता.
त्यामुळे अनिकेची आई करुणा व वडील अंकुश यांना हा विवाह मान्य नव्हता. कारण करुणा धनवे यांच्या भावाची मुलगी त्यांना आपल्या मुलाला पत्नी म्हणून करावयाची होती .मात्र मुलाने प्रेम विवाह केल्याने त्यांना कीर्ती विषयी राग होता. परिणामी सासु करुणा व सासरे अंकुश हे सून कीर्तीबरोबर चांगले वागत नव्हते तिचा ते सतत मानसिक छळ करत.
घटनेच्या दिवशी गावापासून दूर डोंगरात किर्तीचे आजे सासरे एकटेच राहतात. त्यांचे वय झाल्याने त्यांनाही इतरत्र चालता येत नाही. त्यामुळे त्यांना स्वयंपाक करून देण्यासाठी तीन वाजण्याच्या सुमारास कीर्ती डोंगरात असलेल्या घरी गेली होती.
तेथे गोठ्यामध्ये कीर्तीच्या मृतदेहाचा जळून कोळसा झालेल्या अवस्थेत होता. कीर्तीचे आई वडील मुंबई येथे असल्याने त्यांना फोनवरून कीर्तीचे मामा यांनी माहिती दिली. बुधवारी पहाटे ते पाथर्डीत आले याप्रकरणी कीर्तीचे वडील संतोष विठ्ठल अंगरख( रा. उल्हासनगर) यांनी पाथर्डी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून घेतला आहे.