अहिल्यानगर जिल्ह्यात मागील काही दिवसात पतसंस्थांसह अनेक घोटाळे समोर आले. यात काहींवर गुन्हेही दाखल झाले. आता आणखी एका पतसंस्थेचा घोटाळा समोर आलाय. ७९ लाखांच्या रकमेचा अपहार या पतसंस्थेने केलाय. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात नवनागापुरच्या चेतना कॉलनीत असलेल्या श्री विठ्ठल रुख्मिणी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठेवीदाराने ४६ दिवसांच्या मुदतीवर ९ पावत्यांद्वारे ठेवलेली ७९ लाखांची रक्कम मुदत संपूनही परत न करता संचालक मंडळाने या रकमेचा संगनमताने अपहार करत ठेवीदाराची फसवणूक केल्याचा आरोप यात करण्यात आलाय.
याबाबत प्रमाणित लेखापरीक्षक सोमनाथ बाबुराव सोनवणे (रा.भिस्तबाग नाका, पाईपलाईन रोड) यांनी फिर्याद दिली आहे. गुन्हा दाखल झालेल्या आरोपींमध्ये उमेश रमाकांत निंबाळकर, संजय पांडुरंग भनगडे, नितीन सुधाकर गायकवाड, संजय भास्कर कुसळकर, राजाराम मारुती पाटील, गोविंद ज्ञानदेव गाडेकर, संजय लिंबाजी घुगरे, चांगदेव सोपान जाधव, मनिषा दिलीप म्हस्के, शोभा विलास ढेकणे, स्मिता विलास अडसुरे, विलास नानासाहेब अडसुरे यांचा समावेश आहे.

श्री विठ्ठल रुख्मिणी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या नवनागापुरच्या चेतना कॉलनीत असलेल्या शाखेत ठेवीदार दशरथ सखाराम पुंड (रा. नांदगाव, शिंगवे, ता. नगर) यांनी त्यांच्या वतीने संदीप गाडेकर (रा. नांदगाव, ता. नगर) यांच्या एकूण ९ पावत्यांद्वारे ४६ दिवसांच्या मुदतीवर ७९ लाखांची ठेव ११ फेब्रुवारी २०१८ रोजी तसेच ४ सप्टेबर २०२१ रोजी ठेवली होती. या ठेवीची मुदत संपल्यावर त्यांनी ठेवीच्या रकमेची व त्यावरील व्याजाची रक्कम वेळोवेळी मागितली. मात्र व्यवस्थापक आणि संचालक मंडळाने उडवाउडवीची उत्तरे देत ठेवीची रक्कम देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे ठेवीदार यांनी सहकार खात्याकडे तक्रार केली.
सहकार खात्याच्या आदेशानुसार प्रमाणित लेखापरीक्षक सोमनाथ बाबुराव सोनवणे यांनी संस्थेचे लेखापरीक्षण केल्यावर त्यामध्ये संस्थेचे व्यवस्थापक व संचालक मंडळाने ठेवीदाराच्या ठेव रकमेचा संगनमताने अपहार केल्याचे समोर आले. त्यानंतर लेखापरीक्षक सोनवणे यांनी वरिष्ठ कार्यालयास अहवाल सादर केला. या अहवालावरून वरिष्ठ कार्यालयाने लेखापरीक्षक सोनवणे यांना याबाबत पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्याच्या सूचना दिल्या.
त्यानुसार लेखापरीक्षक सोनवणे यांनी १ एप्रिल रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.