अहिल्यानगर जिल्ह्यातून एक मोठी बातमी आली आहे. एका तहसीलदारानावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. श्रीगोंद्याच्या तहसीलदार क्षितीजा वाघमारे यांना निलंबित करण्यात आले आहे.
महसूल व वन विभागाच्या आदेशानुसार, एका संस्थेचे नाव बदलून खाजगी व्यक्तींना मालकी हक्क बहाल करण्याच्या प्रक्रियेत नियमांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाले.

त्यामुळे शासकीय आदेशात अनियमितता केल्याच्या आरोपावरून श्रीगोंद्याच्या तहसीलदार क्षितीजा वाघमारे यांना महाराष्ट्र शासनाने निलंबित केले आहे.
शासकीय कर्तव्यात कसूर केल्याने महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील नियम ३ व शिस्त व अपील नियम १९७९ नुसार त्यांच्यावर विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
निलंबनाच्या कालावधीत त्यांचे मुख्यालय जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर राहील व श्रीमती वाघमारे यांना पुढील आदेश येईपर्यंत मुख्यालय सोडू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
त्यांना शासन नियमानुसार निलंबन निर्वाह भत्ता मिळणार आहे. तसेच, त्यांना कोणतीही खाजगी नोकरी, व्यवसाय अथवा व्यापार करता येणार नाही अशी माहिती समजली आहे.