Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यातील पहिलीच घटना ! अवघ्या चोवीस तासात आरोपपत्र दाखल

Published on -

Ahilyanagar News : महिलेचा विनयभंग करुन तिला मारहाण, शिवीगाळ करुन जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला अटक करुन त्याच्या विरुद्दध केवळ चोवीस तासात न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्याची किमया पाथर्डीचे पोलिस हे.काँ. नितीन दराडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील ही पहिलाच घटना आहे.

शासनाच्या शंभर दिवस गतीमान प्रशासन कार्यक्रमात ही मोलाची कारवाई करण्यात आली आहे. पाथर्डी पोलिसांचे याबद्दल कौतुक करण्यात येत आहे. तालुक्यातील एका गावात ही घटना २९ एप्रिल २०२५ रोजी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी महिलेच्या घरासमोर ८ ते १० लोकांचा घोळका जमला होता.

तेव्हा फिर्यादी महिलेच्या घरावर कोणीतरी दगड फेकला म्हणुन महिलेने तुम्ही माझ्या घरासमोर का जमला आहात व माझ्या घरावर कोणी दगड मारला असे विचारले असता घोळक्यातील सौरभ उर्फ बबलु बाबासाहेब नवगिरे पुढे आला व त्याने सदर महिलेच्या अंगावरील कपडे फाडुन तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करुन महिलेला शिवीगाळ व मारहाण करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली.

साक्षीदार त्याच्याकडे पळाले असता तो तेथुन पळुन गेला. महिलेने पोलिसात २९ एप्रिल २०२५ रोजी पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हे. कॉ. नितीन दराडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी या महिलेवरील गैरप्रकाराचा तपास करुन यामध्ये आरोपीला अटक केली.

सात साक्षीदार तपासले व पाथर्डीच्या प्रथमवर्ग न्यायादंडाधिकाऱ्यांसमोर आरोपपत्र देखील दाखल केले आहे. ही जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे. मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवस गतीमान प्रशासन या योजनेत हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. पोलिसांच्या शासनाच्या या कामाचे कौतुक करण्यात येत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News