Ahilyanagar News : नेवासा तालुक्यातील नागरिकांसाठी अत्यंत महत्वाची माहिती समोर आली आहे नेवासा तालुक्यात ७,१६३ नागरिकांची ई-केवायसी अद्याप बाकी आहे. ३० एप्रिल २०२५ ही अंतिम तारीख असून, यापूर्वी केवायसी न झाल्यास शिधापत्रिका बंद होण्याचा इशारा देण्यात आला आहे. आता ‘मेरा राशन’ अॅपद्वारे घरी बसूनही केवायसी करता येईल – पण अजूनही उशीर झाला तर धान्याचा हक्क गमावण्याची शक्यता आहे.
ई-केवायसी न केल्यास शिधा बंद
नेवासा तालुक्यातील शिधापत्रिकाधारकांनी जर वेळेत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर त्यांना स्वस्त दरातील धान्यापासून वंचित राहावं लागू शकतं. अन्न पुरवठा विभागाचे तपासणी अधिकारी सुदर्शन दुर्योधन यांनी ही माहिती दिली आहे. मार्च अखेरपर्यंत 67.80 टक्के लाभार्थ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली असली, तरी अजूनही मोठ्या संख्येने कुटुंबे या प्रक्रियेत सहभागी झालेली नाहीत.

नेवासा तालुक्यातील 151 शासकीय रेशन दुकानांमार्फत सुमारे 1.90 लाख लाभार्थ्यांना दरमहा धान्य दिलं जातं. या वितरण प्रक्रियेत पारदर्शकता आणि अचूकता आणण्यासाठी ई-केवायसी अनिवार्य करण्यात आलं आहे. सध्या तालुक्यातील 7,163 लाभार्थ्यांना ही प्रक्रिया पूर्ण करणं बंधनकारक आहे.
विशेष म्हणजे, ‘अंत्योदय’ श्रेणीतील सुमारे 7,050 कुटुंबांना दरमहा 35 किलो धान्याचा लाभ मिळतो. या योजनेत आणखी 113 लाभार्थ्यांना जोडण्याची शक्यता असून, यात अपंग, गंभीर आजारी, परित्यक्ता आणि विधवा महिलांचा समावेश आहे. ई-केवायसी न केल्यास या लाभार्थ्यांचे रेशनकार्ड निलंबित होण्याची शक्यता असून
दुर्योधन यांनी यावेळी ई-श्रम कार्डधारकांसाठी एक महत्त्वाची माहितीही दिली. ज्या नागरिकांकडे ई-श्रम कार्ड आहे पण रेशनकार्ड नाही, त्यांनी पुरवठा विभागाच्या नेवासा तहसील कार्यालयात संपर्क साधावा. आवश्यक कागदपत्रे सादर केल्यास त्यांना शिधापत्रिका मिळू शकते.
घरबसल्या ई-केवायसी
लाभार्थ्यांनी ‘मेरा राशन’ या मोबाईल अॅपचा वापर करून घरबसल्या ई-केवायसी करू शकतात. ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी 30 एप्रिल 2025 ही अंतिम मुदत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. नागरिकांनी शेवटच्या क्षणाची वाट न पाहता लवकरात लवकर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून आपला हक्काचा शिधा अबाधित ठेवावा, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.