अहिल्यानगर करांनो, सावध व्हा ! आपल्या बसस्थानकांची स्थिती ‘स्वारगेट’ होणार नाही ना ?

Published on -

Ahilyanagar Special Report : स्वारगेट बसस्थानकात तीन दिवसांपापूर्वी तरुणीवर अत्याचार होण्याची घटना घडली. त्यानंतर बसस्थानके महिलांसाठी असुरक्षित असल्याचे चर्चा अचानक वाढल्या. स्वारगेटच्या एका घटनेने सरकारची यंत्रणा खडबडून जागी झाली. स्वारगेट बसस्थानकातील गॉर्डचे निलंबन, अधिकाऱ्यांची चौकशी असे सगळे सोपस्कार पूर्ण झाले. त्यानंतर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील बसस्थानके, तेथील सीसीटीव्ही, पथदिवे, महिला शौचालय, गार्ड, वाँचमेन, अधिकारी यांची चर्चा सुरु झाली. कोणती बसस्थानके किती असुरक्षित आहेत, याचा काथ्याकुट सुरु झाला.

अहिल्यानगर जिल्ह्यातील बसस्थानकांची स्थिती

सगळ्याच वृ्त्तपत्रांचे रकाने, पोर्टल, यू-ट्युब चॅनल्सवर वेगवेगळ्या जिल्ह्यंतील बातम्या झळकू लागल्या. आता अहिल्यानगर जिल्हा कसा मागे राहिल..? महाराष्ट्रात कुठे झाले नसतील, एवढे गुन्हे अहिल्यानगर जिल्ह्यातील बसस्थानकांवर नोंदलेले गेले आहेत. महिला-मुलींचे छेड, मंगळसूत्रांच्या चोऱ्या, डागिन्यांची लुटमार, पर्स चोरी, मोबाईल चोरी, अशा कमीतकमी हजारभर घटना नगर जिल्ह्यात घडल्या असतील. पण..? पण, फक्त बातमी येण्यापुरत्या चर्चा होतात. काय आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील बसस्थानकांची स्थिती.. ? याच विषयाचा हा स्पेशल रिपोर्ट.

स्वारगेटची घटना घडल्यानंतर, या घटनेचे अहिल्यानगर जिल्ह्यातही पडसाद उमटले. विरोधी पक्षाच्या काही महिला संघटनांनी आंदोलनेही केली. पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनीही गुरुवारी तातडीने बैठक घेतली. महामार्गांवरील खासगी हॉटेल, ढाब्यांवर थांबणाऱ्या एसटी बससाठी नियमावली तयार करा, ढाब्यांसाठी नियमावली लागू करा, सर्व बसस्थानकात सीसीटीव्ही बसवा, एसटी व पोलिस अधिकाऱ्यांच्या संपर्क क्रमांकाचे फलक लावा, जिल्ह्यातील सर्व आगारांची पाहणी करा, अशा सूचना एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. स्वारगेटच्या घटनेनंतर आता जिल्हा प्रशासनही सतर्क झाले पाहिजे, ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

त्यानंतर गुरुवारीच रात्री अचानक नगर दक्षिणेचे खा. निलेश लंके यांनीही नगरमधील पुणे बसस्थानकाचा पाहणी केली. तेथील व्यवस्थेवर त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले. स्थानकात पंखे नाहीत, महिला स्वच्छतागृहात लाईट नाही, काही सीसीटीव्ही चालू तर काही बंद आहेत, असे अनेक गंभीर प्रकारांची पोलखोल खा. लंके यांनी केली. त्यानंतर खा. लंके यांनी अचानक आक्रमक मूड घेत पत्रकारांसमोर सरकारवर ताशेरे ओढले. प्रत्येक बसमध्ये सीसीटीव्ही बसविण्याची मागणी त्यांनी परिवहन मंत्र्‍यांकडे केली.

अगोदर विखे व त्यानंतर लंके असे सत्ताधारी व विरोधक दोघांनीही बसस्थानकाच्या सुरक्षिततेबाबत लक्ष घातल्याने काहीतरी चांगले हाती येईल, अशी अपेक्षा आहे. कारण यापूर्वी जिल्ह्यातील अनेक महत्त्वाच्या बसस्थानकांवर शेकडो निंदणीय घटना घडल्या आहेत. त्यामुळे या प्रकाराला आता आळा बसेल, अशी किमान अपेक्षा ठेवता येऊ शकते.

नगर जिल्ह्यातील बसस्थानकांचा विचार केला तर, जिल्ह्यातील तारकपूर बसस्थानक, माळीवाडा बसस्थानक, पुणे बसस्थानक, कोपरगाव बसस्थानक, शिर्डी बसस्थानक, जामखेड बसस्थानक आणि संगमनेर बसस्थानक अशी आठ बसस्थानके अ वर्गात येतात. पुणे बसस्थानकातून रोज १ हजार ६७०, माळीवाड्यातून १ हजार ४८८, कोपरगावातून १ हजार १६, श्रीरामपूरमधून ६९४ तर जामखेड बसस्थानकातून ५२० बसगाड्यांच्या फेऱ्या होतात.

आता ब वर्ग बसस्थानकांचा विचार केला तर, लोणी बुद्रुक बसस्थानकातून ४९४, अकोले बसस्थानकातून ३०२, राहाता बसस्थानकातून २१६, नेवासा बसस्थानकातून ४२४, पाथर्डी नव्या बसस्थानकातून ३५८, पाथर्डी जुन्या बसस्थानकातून ३०८, पारनेर बसस्थानकातून २६७, शेवगाव बसस्थानकातून ४६३, कर्जत बसस्थानकातून ३५०, राहुरी बसस्थानकातून ३०८, कोल्हार बसस्थानकातून २८८ आणि श्रीगोंदा बसस्थानकातून ४६० फेऱ्या होतात.

क वर्ग बसस्थानकात नऊ बसस्थानकांचा समावेश आहे. त्यात बाभळेश्वर बसस्थानकातून २१२ फेऱ्या, बेलापूर बसस्थानकातून १९६ फेऱ्या, राजूर बसस्थानकातून १२६ फेऱ्या, खर्डा बसस्थानकातून ४७ फेऱ्या, मिरजगाव बसस्थानकातून ८० फेऱ्या, वांबोरी बसस्थानकातून १०८ फेऱ्या, सोनई बसस्थानकातून १२ फेऱ्या, सुपा बसस्थानकातून ५२ फेऱ्या, राशीन बसस्थानकातून ८८फेऱ्या सुरु आहेत. आता ही सगळी आकडेवारी वर्षभरापूर्वीची आहे. त्यामुळे या फेऱ्या कदाचित सिझन व हाफ सिझनला कमी-जास्तही होत असाव्यात. म्हणजेच संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याचा विचार केला तर, किमान ५० हजार ते १ लाख प्रवासी नगर जिल्ह्यातून प्रवास करतात, असे म्हणता येते.

आता ही सगळी आकडेवारी पाहिली तर प्रशानाच्या तेवढ्या सुविधा आहेत का? महिला सुरक्षेसाठी काही इंतजाम आहेत का? भुरट्या चोऱ्या रोखण्यासाठी पोलिस यंत्रणा आहे का? महिला शौचालय सुस्थितीत आहेत का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे, नाकारार्थी येतात. हे सगळं चित्र आता प्रशासनाला बदलावे लागणार आहे. विखे व लंके या दोन्ही नेत्यांनी हे प्रश्न तातडीने सोडवावेत, प्रसंगी रस्त्यावरही उतरावे, अशीच नगरकरांची अपेक्षा आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe