अहमदनगर ब्रेकिंग : वाळूच्या ट्रॅक्टरखाली चिरडून सायकलस्वार ठार

Ahmednagarlive24 office
Updated:
Ahmadnagar Braking

Ahmadnagar Braking : भगवतीपूर शिवारात प्रवरा नदीपात्रामध्ये रामपूर बंधाऱ्यानजीक गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून वाळूचा शासकीय डेपो सुरू आहे. येथून वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीखाली चिरडल्याने राहुरी तालुक्यातील रामपूर येथील सायकलस्वार जागीच ठार झाला.

या घटनेमुळे भगवतीपूर तसेच रामपूरमध्ये शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. आता तरी हा ठेका बंद करून संबंधित ठेकेदारावर महसूल प्रशासनाने कारवाई करावी, अन्यथा कुठल्याही क्षणी रास्ता रोको करण्याचा इशारा स्थानिक ग्रामस्थांनी दिला आहे.

सुधाकर कारभारी नालकर (वय ५५, रा. रामपूर, ता. राहुरी) असे मयत सायकलस्वाराचे नाव आहे. काल मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास भगवतीपूर येथे रामपूर फाट्याजवळ हा अपघात झाला.

सुधाकर नालकर हे प्रवरानगर येथील प्रवरा पब्लिक स्कूलमध्ये कर्मचारी म्हणून कार्यरत होते. काल दुपारी तीन वाजेच्या सुमारास ते काम आटोपून प्रवरानगर येथून रामपूरला आपल्या घरी परतत होते.

यादरम्यान प्रवरा नदीपात्रातील वाळूच्या डेपोहून वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर चालला असता धडक बसून नालकर ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडले. त्यानंतरही ट्रॅक्टर जागेवर न थांबता तसाच पुढे निघून जात पसार झाला.

त्यामुळे ट्रॉलीची आणखी चाके त्यांच्या शरीरावरून गेली. यामध्ये नालकर जागीच मृत्युमुखी पडले असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. घटनास्थळी प्रचंड रक्तस्राव होऊन रक्ताचे थारोळे साचले होते. उत्तरीय तपासणी करता मृतदेह लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला.

नालकर हे अत्यंत शांत स्वभावाचे व गरीब शेतकरी कुटुंबातील होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन बंधू असा परिवार आहे. शासकीय वाळू डेपोसाठी वाहतूक करताना ट्रॅक्टर रस्त्यावर वाळू सांडतात. या वाळूवर घसरून अनेक जण गेल्या आठ दिवसांत पडले आहेत. त्यात काही जखमी झाले.

त्यांच्या वाहनांचेदेखील प्रचंड नुकसान झाले. वाळूवाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रॅक्टरमुळे येथे हकनाक कोणाचा तरी बळी जाईल, स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार वाळूचा ठेका घेतलेला ठेकेदार अत्यंत मुजोर आहे. तो ग्रामस्थांच्या म्हणण्याला दाद देत नाही.

त्यामुळे महसूल प्रशासनाने त्याच्यावर तात्काळ कारवाई करावी किंवा ठेका बंद करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती, परंतु महसूल प्रशासनाने या प्रश्नाकडे कुठलेही लक्ष न दिल्यामुळे नालकर यांचा बळी गेला आहे.

याला प्रशासन सर्वस्वी जबाबदार आहे. त्यामुळे आता तरी प्रशासनाने हा ठेका तात्काळ बंद करून ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी रामपूर ग्रामस्थांनी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe