Ahmadnagar breaking : अशोकनगर कारखाना समोरील परिसरातील कालव्या मधील वाहत्या पाण्यात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह तरंगलेल्या अवस्थेत नुकताच आढळुन आला. यावेळी जमलेल्या ग्रामस्थांनी पोलीस पाटील चंद्रकला यशवंत गायधने यांना घटनेची माहिती दिली. त्यावरून संजय बाजीराव गायधने यांनी शहर पोलीस स्टेशनला याबाबत खबर दिली.
त्यानंतर पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संतोष परदेशी, पो. कॉ. प्रविण कांबळे, गृहरक्षक दलाचे राजेंद्र देसाई, पोलीस मित्र गणेश गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली.
सदरचा कालव्याच्या पाण्यातील मृतदेह स्थानिक नागरिकांच्या मदतीने पाण्याबाहेर घेऊन रुग्णवाहिकेमधुन श्रीरामपूरात शवविच्छेदनासाठी हलविण्यात आला. सदरचा मृतदेह हा अनोळखी पुरुष जातीचा असून सदर व्यक्तीचे अंदाजे वय ५० ते ५५ दरम्यान असल्याचे दिसून आले.
सदर इसमाची उंची पाच फूट तसेच केस अर्धवट काळे पांढरे असून पोट फुगलेल्या अवस्थेत तसेच अंगामध्ये सँन्डो बनियन व्हिआपी अंडरवियर काळी पांढरी रेषा असलेला शर्ट तसेच राखाडी रंगाची पॅन्ट अंगामध्ये परीधान करून उजव्या हातामध्ये दोरा बांधलेला असलेले आढळुन आल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, शहर पोलीस ठाण्याचे पीएसआय सोळुंखे, पोलीस हवालदार रघुनाथ खेडकर यांनी घटनास्थळी भेट दिली असून अज्ञात व्यक्ती विषयी माहिती अथवा ओळख पटविण्यासाठी श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.