Ahmadnagar Breaking : सध्या कापसाचा हंगाम चालू आहे. त्याचबरोबर राहुरी तालुक्यात कापूस चोरीच्या घटनेत वाढ झाली. राहुरी पोलिसांनी तालुक्यातील देवळाली प्रवरा परिसरात कापूस खरेदी केंद्रातील कापूस चोरी करणारी सहा जणांची टोळी अवघ्या २४ तासांच्या आत गजाआड केली; मात्र चारजण पळून जाण्यात यशस्वी झाले.
याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील अतुल नानासाहेब कदम यांच्या शिवतेज कापूस खरेदी केंद्र तसेच तेजस कदम यांच्या साईतेज कापूस खरेदी केंद्रातून ८० हजार ५०० रुपये किंमतीचा साडेअकरा क्विंटल कापूस चोरी गेल्याची घटना २२ नोव्हेंबर २०२३ रोजी रात्री घडली होती.
याप्रकरणी अतुल नानासाहेब कदम यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी या ताबडतोब तपासाची चक्रे फिरवली.
गुप्त खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुरज गायकवाड, पोलीस नाईक राहुल यादव, नदीम शेख, सम्राट गायकवाड यांच्या पथकाने आरोपींची धरपकड सूरु केली
आणि अवघ्या २४ तासांच्या आत ६ आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणांहून आरोपींच्या मुसक्या आवळून गजाआड केले. यावेळी गुन्ह्यात वापरलेली टाटा एस गाडी (क्रमांक एमएच ४४- ८३८२) व इंनोव्हा गाडी (क्रमांक एम एच ०१-एसी- ४२७१) ही दोन वाहने जप्त केली.
आरोपी करण माळी याने कापुस चोरी करण्यासाठी एक टोळी बनवली होती. त्यामध्ये पप्पू गुलाब बर्डे, ऋषिकेश मधुकर लोखंडे (वय २१ वर्षे), प्रज्वल सूर्यभान झावरे (वय २० वर्षे), प्रज्वल अशोक भांड (वय १९ वर्षे), विनीत संजय कोकाटे (वय १८ वर्षे), अक्षय नारद, बन्नी बर्डे, प्रतिक बाळासाहेब बर्डे (वय २१ वर्षे), सचिन रमेश बर्डे ऊर्फ सचिन टिचकुले (वय २१ वर्षे), अशा १० जणांची टोळी बनवली होती.
पोलिस पथकाने प्रज्वल झावरे, ऋषिकेश लोखंडे, प्रज्वल भांड, विनीत कोकाटे, प्रतीक बर्डे, सचिन बर्डे उर्फ सचिन टीचकुले या सहा जणांना ताब्यात घेतले. तर मुख्य आरोपी करण माळी, पप्पु बर्डे, बन्नी बड़ें, अक्षय नारद हे चारजण पळून जाण्यात यशस्वी झाले.
पकडलेल्या आरोपींना आज राहुरी येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार राहुल यादव हे करीत आहेत.