Ahmadnagar breaking : राहुरी तालुक्यातील कनगर येथील कनकावती देवीच्या यात्रेनिमित्त गंगाजल आणण्यासाठी गेलेल्या कावड नेणाऱ्या भक्तांना शहरातील सिंधी मंदिरासमोर मारहाण झाल्याने राहुरी तालुक्यातून संताप व्यक्त होत आहे.
अशा प्रवृत्तींवर पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. याप्रकरणी मारहाण करणाऱ्या प्रवृत्तींविरोधात येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहुरी तालुक्यातील कनगर येथील कनकावती माचेची यात्रा असून यात्रेनिमित्त पुणतांबा येथून गंगेचे पाणी आणण्यासाठी गेलेल्या भक्तांना शहरातील सिंधी मंदिराच्या गेटसमोर काही अपप्रवृत्तीच्या आरोपींकडून शनिवारी रात्री मारहाण करण्यात आली.
काहीही कारण नसतांना कावड नेणाऱ्या भक्तांची टाटा जीप गाडी अडवुन हल्ला करुन, त्यांना लोखंडी रॉड व दगडाने मारहाण करण्यात आली आहे.श्रीरामपूर शहरात मागील काही काळातही कावडीवाल्यांवर वार्ड नंबर दोन मधील टवाळखोरांकडून मारहाण करण्यात आली होती.
त्यानंतर पुन्हा राहुरी तालुक्यातील कनगर येथील कनकावती माता यात्रेनिमित्त पुणतांबा येथुन गंगेचे पाणी आणण्यासाठी आलेल्या कावडीवाल्यांना मारहाण करण्यात आल्याची संतापजनक घटना घडल्याने हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहे.
या प्रकरणातील आरोपींच्या घरावर बुलडोझर चालविण्याची मागणी केली जात आहे. सदर गुन्हा दाखल होण्यासाठी शहर पोलीस ठाण्यात काल रात्री आठ वाजल्यापासून मध्यरात्री अडीच वाजेपर्यंत हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती.
माहिती देण्यास टाळाटाळ
राहुरी तालुक्यातील कणगर येथील कावड नेणाऱ्या भक्तांना श्रीरामपूर शहरात मारहाण करण्यात आली. याप्रकरणी अपप्रवृत्तीच्या लोकांवर गुन्हाही दाखल झाला. गुन्हा दाखल असूनही याबाबत शहर पोलिसांना विचारणा केली असता,
त्यांनी टोलवाटोलवी करत माहिती देण्यास टाळाटाळ केली. मारहाण करणाऱ्या अपप्रवृत्तीच्या लोकांना त्वरीत अटक करुन कडक शासन करावे, अशी मागणी केली जात आहे.